Tuesday, April 28, 2026

बारामतीची कमान कोणाकडे?

बारामतीची कमान कोणाकडे?

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र

बारामतीमध्ये आता वारसाहक्काच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार या दोन दिग्गज नेतृत्वांनी प्रदीर्घ काळ गाजवलेल्या या मतदारसंघाची कमान २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा एकदा 'पवार विरुद्ध पवार' असा सामना रंगण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य लढतीमुळे केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातील हा सामना राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो, हे मात्र निश्चित.

राज्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र ही आजवर बारामतीची मुख्य ओळख राहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचे यशस्वी नेतृत्व केले. मात्र, आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत असतानाच, या मतदारसंघाचा वारसा नेमका कुणाकडे जाणार? या विषयावरील चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे 'बारामतीचा खरा वारसदार कोण?' हा आगामी काळातील सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे.

पवार कुटुंबाचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान अत्यंत अढळ राहिले आहे. गेल्या अनेक दशकांपासून या कुटुंबाने सत्तेच्या केंद्रस्थानी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काळानुसार कुटुंबातील पिढ्या बदलत गेल्या आणि त्यासोबतच राजकीय दृष्टिकोन, कार्यपद्धती आणि नेतृत्वशैलीतही बदल होत गेले. या पार्श्वभूमीवर २०२९ च्या निवडणुकीत जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातील संभाव्य लढत ही 'जुन्या आणि नव्या पिढीतील संघर्षाचे' प्रतीक मानली जात आहे. जय पवार हे पारंपरिक राजकारणाचा वारसा जपणारे, संघटनात्मक बळावर विश्वास ठेवणारे आणि ग्रामीण भागातील मतदारांशी घट्ट नाते निर्माण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्य भर विकासकामे, सहकार क्षेत्र आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यावर राहिला आहे. परिणामी, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक स्थिर मतदारवर्ग त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसते.

पवार आणि बारामती हे समीकरण अत्यंत जुने आणि अतूट आहे. १९६७ पासून शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर १९९१ पासून अजित पवार यांनी बारामतीचे पालकत्व स्वीकारले. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवली असून, आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जाते. जरी सध्या सुनेत्राताईंनी बारामतीच्या नेतृत्वाची कमान हाती घेतली असली, तरी २०२९ मध्ये ही मोठी जबाबदारी त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बारामतीत मतदानाच्या दिवशी घडलेल्या घडामोडी बरेच काही सांगून जातात. अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली असली, तरी त्यांना भाषेची समस्या भेडसावते. शिवाय, लोकांशी किंवा ग्रामीण वातावरणाशी थेट कनेक्ट होण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे कमी असल्याचे जाणवते. याउलट, जय पवार यांच्याकडे ते कौशल्य उपजत आहे. पोटनिवडणुकीच्या संपूर्ण नियोजनात जय यांनीच महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे बोलले जाते. गावोगावी पारावर बसून लोकांशी संवाद साधणे, वैयक्तिक बैठका घेणे, यातून त्यांचा एक वेगळा प्रभाव निर्माण झाला आहे. "२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मीच बारामतीचा उमेदवार असावा अशी लोकांची इच्छा आहे," या त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात बराच धुरळा उडाला. अर्थात, नंतर "पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे," असा 'यू-टर्न' त्यांनी घेतला असला, तरी समर्थकांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता, तो पोहोचला आहे. जय पवारांच्या या पवित्र्यानंतर पवार कुटुंबातूनही विविध प्रतिक्रिया उमटल्या. अलीकडे रोहित पवार यांचाही बारामतीतील वावर वाढला असून, २०२९ मध्ये 'पवार विरुद्ध पवार' अशी लढत होऊ शकते, असे विधान त्यांनी केले आहे. वास्तविक, "अशी लढत व्हायला नको, पण युगेंद्र विरुद्ध जय असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे रोहित पवार बोलून गेले. अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली असली, तरी रोहित पवारांच्या विधानाने पवार कुटुंब एकत्र येणार की एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून वावरणार, हा प्रश्न अधिकच संदिग्ध झाला आहे. २०२४ मध्ये युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधात निवडणूक लढवली होती. "लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण दोन भावांमध्ये यापुढे लढत होऊ नये," असे युगेंद्र यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. तसेच, "२०२९ ला अजून बराच अवकाश आहे, तोपर्यंत बारामतीचे दोन मतदारसंघही होऊ शकतात," असा सूचक इशाराही त्यांनी दिला. यावरून बारामतीच्या जहागिरीवरून खरेच वाद आहेत की हा एखादा 'अंडरस्टँडिंग गेम' आहे, असा प्रश्नही उपस्थित होतो. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काका श्रीनिवास पवार यांनी "हे बोलायची ही वेळ नाही," असे ठणकावत रोहित आणि जय या दोघांचेही कान टोचले आहेत.

एकेकाळी पवार कुटुंबातील सर्व महत्त्वाचे निर्णय शरद पवार घेत असत. मात्र, आता प्रकृतीमुळे त्यांच्यावरही काही मर्यादा आल्या आहेत. अजितदादांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाने एक कर्ते नेतृत्व गमावले आहे. या कठीण काळात बारामतीच्या वारसदाराचा निर्णय सहमतीने होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे, बारामतीवर अनेक वर्षांपासून भाजपचे डोळे आहेत; परंतु पवारांच्या या बालेकिल्ल्यात त्यांची डाळ काही केल्या शिजलेली नाही. पवार कुटुंबात अंतर्गत मतभेद असले तरी, त्यांनी पवार घराण्याव्यतिरिक्त इतरांना तिथे शिरकाव करू दिलेला नाही. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

शेवटी, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात जर खरोखरच ही संभाव्य लढत झाली, तर बारामतीची कमान नेमकी कोणाकडे जाणार, हे पाहणे कमालीचे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही केवळ एक निवडणूक न राहता बारामतीच्या राजकारणातील एका मोठ्या परिवर्तनाची कथा ठरू शकते. जुने आणि नवे, अनुभव आणि नवकल्पना, परंपरा आणि आधुनिकता या सर्वांचा रंजक संगम या लढतीत पाहायला मिळेल यात शंका नाही.

Comments
Add Comment