Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'बिग बॉस ३ ओटीटी शो' तातडीने बंद करा

‘बिग बॉस ३ ओटीटी शो’ तातडीने बंद करा

शिवसेना सचिव आमदार डॉ. मनिषा कायंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअॅलिटी शो बिग बॉस सिजन ३ मध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्ता आमदार ड़ॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

डॉ. मनिषा कायंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बिग बॉस सिजन ३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बिभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे दाखवल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले.

याच शो दरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याचा सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका ड़ॉ. कायंदे यांनी केली.

डॉ. कायंदे पुढे म्हणाल्या की, बिग बॉस ३ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही हा शो पाहतात. अरमान मलिक जे बोलत आहे त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावर देखील वायरल झाला आहे का, याची तपासणी करावी, हा गुन्हा ज्या ज्या कायद्याखाली येत असेल ते सर्व आयपीसीचे कलम सदर शो मध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर व शोच्या सीईओवर लावण्यात यावे, अशी लेखी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ओटीटीलाही सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे डॉ. कायंदे यांनी म्हटले आहे. या संदर्भात काय कारवाई करण्यात आली याची डॉ. कायंदे या स्वत: पोलीस आयुक्तालयात जाऊन माहिती घेणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -