Friday, February 13, 2026

मतदानापूर्वीच राज्यात भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा षट्कार!

मतदानापूर्वीच राज्यात भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा षट्कार!

कल्याणमध्ये तीन, धुळ्यात दोन, तर पनवेलमध्ये एक विजयी

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला. येथील प्रभाग क्र. १८ मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र.२६-क मधून आसावरीताई केदार नवरे यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्हीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी, चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून दोन्ही महिला उमेदवारांचे बोलणे करून दिले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २६ ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, भाजपने येथील महापालिकेत विजयाची हॅटट्रिक केली असून स्वबळावरील विजयासाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी भाजप केवळ ५७ जागा दूर आहे. १२२ जागा असलेल्या केडीएमसी महापालिकेत भाजप ६५ आणि शिवसेना ५७ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, भाजप-शिवसेना युतीच्या एकूण १२२ जागांपैकी भाजपने तीन जागा जिंकत आघाडी घेतली आहे. पनवेल महापालिकेतही भाजपने खाते उघडले असून भाजपचे नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

मुंबईत महायुतीला मतदानापूर्वीच धक्के

कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रभाग क्रमांक २११ मधील शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला आहे. प्रभाग क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा अर्जही बाद झाला आहे. खामकर या एबी फॉर्म मिळाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात उशिरा पोहोचल्या. त्यांना १५ मिनिटे विलंब झाला. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला.

उबाठा गटाचे पाच उमेदवार ‘डिजिटल’मुळे अडचणीत

मालाड पूर्वेतील ईशान्य विभागातील निवडणूक कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात येत आहे. शिवसेेनेने ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४०, ४१ आणि ४२ मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना उबाठाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी सही असल्याचे लक्षात आले आहे. त्यावर शिवसेनेचे विभागप्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या कायद्यावर बोट ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या एबी फॉर्मवर प्रत्यक्ष स्वाक्षरी गरजेची असते. डिजिटल स्वाक्षरीमुळे ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतात.

धुळ्यातही खाते उघडले : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजित राजे भोसले यांनी काल पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपचे तिकीट मिळवले होते. धुळे महापालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान त्यांच्याविरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ६ ब मधून ज्योत्स्ना पाटील याही विजयी झाल्या आहेत.

Comments
Add Comment