मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची बुधवारी मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. राज्यातील उर्वरित २८ महानगरपालिकांसाठीही आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाण्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू, कल्याण-डोंबिवलीमध्ये एमआयडीसी संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, मीरा-भाईंदर येथे कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, उल्हासनगर शहरात
एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक निलेश गाटणे तर भिवंडी-निजामपूर येथे आदिवासी विकास महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबईत महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसई-विरार येथे पूर्वीपासून निवडणूक काळात तणावाचे वातावरण राहिल्याने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डचे सीईओ प्रदीप पी. यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल येथे आयसीडीएस आयुक्त कैलास पगारे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.






