Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीKaran Johar : नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी करण जोहरची न्यायालयात धाव!

Karan Johar : नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी करण जोहरची न्यायालयात धाव!

नेमकं काय घडलं?

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याने त्याची ओळख असलेला शब्द ‘भिडू’ हा गैरपद्धतीने वापरल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहर (Karan Johar) याने अशाच एका प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या नावाचा एका चित्रपटाच्या शीर्षकात चुकीचा वापर केल्याचा आरोप करत त्याने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) दाद मागितली आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या चित्रपटावर करणने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा निर्माता इंडिया प्राइड ॲडव्हायझरी आणि संजय सिंग आणि लेखक-दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात करणने डीएसके लीगलच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करणने आपल्या याचिकेत असं लिहिलं आहे की, चित्रपटाच्या नावावरून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याचे नाव वापरण्यापासून रोखले पाहिजे, असं करणचं म्हणणं आहे.

खटल्यात करणने दावा केला की, ‘जे चित्रपटाच्या शीर्षकामध्ये बेकायदेशीरपणे माझं नाव वापरत आहेत, तो चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांशी माझा कोणताही संबंध नाही. चित्रपटाच्या शीर्षकात माझं नाव थेट नमूद केलं आहे, यामुळे माझे व्यक्तिमत्त्व हक्क, प्रसिद्धी आणि गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे. माझ्या ‘ब्रँड नेम’चा गैरवापर करून निर्माते माझ्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेत आहेत, जे कायदेशीररित्या योग्य नाही.’ करणने फिर्यादीत म्हटलं आहे की, हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याचे पोस्टर्स सार्वजनिकरित्या आणि सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या ट्रेलर आणि पोस्टर्समुळे करणच्या प्रतिष्ठेला निर्माते नुकसान पोहोचवत आहेत.

या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्यासाठी काल न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठासमोर खटला सादर करण्यात आला. खंडपीठाने त्यास मान्यता दिली असून तातडीने दिलासा मिळावा यासाठी याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ हा एक कमी बजेटचा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमन सिंग दीप, पार्थ आकेरकर, मोनिका राठोड, अमित लेखवानी मुख्य भूमिकेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -