चार महिन्यांत कमावले तब्बल कोट्यावधी रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
बेजींग : सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे वेड लागले आहे. जगातील सर्वात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब. आपल्या कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूब जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देतं. मात्र त्यासाठी तुमच्या व्हिडिओंना ठराविक प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळणं आवश्यक असतं. यासाठी अनेकजण आपल्या यूट्यूब व्हिडिओंचे लाईक्स वाढण्यासाठी ते व्हिडिओ मित्रांसोबत तसेच अनेक ठिकाणी शेअर करतात. तर काही जण फेक अकाउंट तयार करुनही मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. मात्र चीनमधील एका युवकाने लाइक्स वाढण्यासाठी एक अजब गजब प्रकार केल्याचे उघडकीस आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील एका पठ्ठ्याने लाइक्स वाढण्यासाठी तब्बल ४,६०० मोबाईल खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वांग असं त्या युवकाचे नाव असून त्याने २०२२ साली स्वत:च यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. मात्र त्याचे व्ह्यूज जास्त वाढत नव्हते. अशात त्याच्या मित्रांनी त्याला फेक व्ह्यूज वाढवण्याच्या पद्धती सांगितल्या. यानंतर वांगने मोठ्या संख्येने फोन खरेदी केले. सर्व फोन्स एका खास क्लाऊड सॉफ्टवेअरच्या मदतीने तो एकाच वेळी ऑपरेट करू शकत होता. तसेच व्हीपीएनच्या मदतीने तो या सगळ्या मोबाईलची लोकेशनही वेगवेगळी दाखवत होता. अशा प्रकारे त्याने केवळ चार महिन्यांमध्येच तब्बल ३.४८ कोटी रुपये कमावले असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, या व्यक्तीचं बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याचा सगळा सेटअप पाहिल्यानंतर पोलीस देखील चक्रावले. न्यायालयाने या व्यक्तीला १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच वांगला तब्बल ७,००० डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.