वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अलबामामध्ये खोली भाड्याने देण्यावरून झालेल्या वादात ७६ वर्षीय भारतीय वंशाचे प्रवीण रावजीभाई पटेल यांची गेल्या आठवड्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय विलियम जेरेमी मूर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
शेफिल्ड पोलीस प्रमुख रिकी टेरी यांनी सांगितले की आरोपी मूरला घटनेनंतर तातडीने अटक करण्यात आले. तो १३व्या एव्हेन्यूवर एका निर्जन घरात लपण्याचा प्रयत्न करत होता.
मूर एक खोली भाड्याने घेण्यासाठी लेने मोटल येथे आला होता. या दरम्यान प्रवीण रावजीभाई आणि मूर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की मूरने पिस्तूल काढून वयोवृद्ध व्यक्तीला गोळी मारली. रस्त्याच्या बाजूला आश्रयासाठी तसेच राहण्यासाठी छोटे हॉटेल्स असतात त्यांना मोटल म्हटले जात. मूर ८ फेब्रुवारीला हॉटेलची एक रूम भाड्याने घेण्यासाठी गेला होता. यावेळेस पटेल आणि त्यांच्यात वाद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे. वॉरंट जारी होईपर्यंत मूरला शेफील्ड सिटी जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला कोलबर्ट काऊंटी जेलमध्ये आणले जाईल. पोस्टमार्टेम केल्यानंतर प्रवीण रावजीभाई पटेल यांच्यावर १२ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले.