Thursday, May 21, 2026

Meta Layoffs 2026 : मेटामध्ये मोठी कर्मचारी कपात; तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली!

Meta Layoffs 2026 : मेटामध्ये मोठी कर्मचारी कपात; तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली!

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या ‘मेटा’ने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत तब्बल ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास १० टक्के इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. कर्मचाऱ्यांना आधी घरातून काम (Work From Home) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतर पहाटे ई-मेल पाठवून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पहाटे आलेल्या ई-मेलमुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना पहाटे ४ वाजता, तर भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता कंपनीकडून ई-मेल पाठवण्यात आले. या ई-मेलमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं. कार्यालयात गोंधळ, नाराजी किंवा आंदोलन होऊ नये यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये न बोलावता घरातूनच काम करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

या कर्मचारी कपातीमागचं प्रमुख कारण म्हणजे एआयला (AI) दिलं जाणारं प्राधान्य. मेटा आता ‘एआय-नेटिव्ह’ टीम्स उभारण्यावर भर देत असून, कंपनीच्या कामकाजात मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. जवळपास ७,००० कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात येणार असून, सुमारे ६,००० रिक्त पदांची भरती प्रक्रिया देखील थांबवण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एआय तंत्रज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य दिलं असून, यावर्षी या क्षेत्रावर १२५ ते १४५ अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखण्यात आली आहे.

कर्मचारी कपातीच्या चर्चांना सुरुवात झाल्यापासून कंपनीतील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. अनेक कर्मचारी भविष्यासंदर्भात अस्वस्थ होते. काही कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडण्यापूर्वी ऑफिसमधील मोफत स्नॅक्स, चार्जर्स आणि इतर वस्तू गोळा करण्यास सुरुवात केल्याच्याही चर्चा रंगल्या. त्यातच कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या माऊसच्या हालचालींवर लक्ष ठेवणारं नवीन मॉनिटरिंग टूल सुरू केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पाळत ठेवण्याच्या प्रकाराला १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेली कर्मचारी कपात केवळ मेटापुरती मर्यादित नसल्याचंही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सिस्को सिस्टिम्सने जवळपास ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, डिस्ने आणि ओरॅकलसारख्या दिग्गज कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. ओरॅकलने तर जगभरातील २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना पहाटे ई-मेल पाठवून सेवेतून कमी केल्याचं समो`र आलं होतं. तज्ज्ञांच्या मते, हा बदल तात्पुरता नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या रचनात्मक बदलांचा भाग आहे. कंपन्या आता पारंपरिक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा एआय, ऑटोमेशन आणि जटिल डिजिटल प्रणाली हाताळू शकणाऱ्या तज्ज्ञांना अधिक प्राधान्य देत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >