इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि देशातील आता सोळा राज्यांत भाजपा सत्तेवर आल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसची सत्ता केवळ पाच राज्यांपुरती उरली आहे. देशात बारा राज्यांत भाजपाची स्वबळावर सत्ता आहे. भाजपाचे त्या राज्यांत स्वत:चे मुख्यमंत्री आहेत. इतर चार राज्यांत अन्य पक्षांबरोबर वा आघाडी सरकारमध्ये भाजपा सत्तेत सहभागी आहे. काँग्रेसचे देशात आता तीन राज्यांत मुख्यमंत्री स्वबळावर आहेत. अन्य दोन राज्यांत काँग्रेस अन्य पक्षांबरोबर सत्तेत सहभागी आहे. सन २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा देशात ७ राज्यांत भाजपाची सत्ता होती. देशाच्या २५ टक्के लोकसंख्येवर भाजपाची हुकूमत होती. सन २०१८ मध्ये भाजपाची देशात २१ राज्यांत सत्ता होती. देशातील जवळपास ७१ टक्के लोकसंख्या भाजपाच्या सत्तेच्या छत्राखाली होती. नंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या हातून काही राज्ये निसटली. पण नरेंद्र मोदी यांचा करिष्मा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनिती व संघटन कौशल्य यातून पुन्हा भाजपाची घोडदौड सुरू झाली.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर डिसेंबर २०२३ मध्ये देशात भाजपाचा दबदबा पुन्हा वाढला आहे. भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मिळविलेल्या विजयानंतर भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या आता १६ झाली आहे. देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या १२ राज्यांत भाजपाची स्वबळावर सत्ता आहे, तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड व सिक्कीम या चार राज्यांत भाजपा सत्तेत सहभागी आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर कर्नाटक, हिमाचल प्रदेश व आता तेलंगणा या तीन राज्यांत सत्तेवर आहे. बिहार व झारखंड या दोन राज्यांत काँग्रेस तेथील आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. दक्षिण भारत व पूर्व भारत वगळला, तर अन्य प्रदेशात सर्वशक्तिमान पक्ष म्हणून भाजपाची प्रतिमा बनली आहे. ईशान्य भारतात सिक्कीमसह तेथील राज्यांत भाजपाचा विस्तार उत्तम आहे. ईशान्य भारतातील आठ राज्यांत एकूण ४९८ आमदार आहेत. त्यात भाजपाचे २०६ आमदार आहेत. ईशान्येतील राज्यातून एकूण २५ खासदार येतात. त्यात १५ खासदार भाजपाचे आहेत.
भारताच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या राज्यांत भाजपाने आपला पाया भक्कम रोवला आहे. महाराष्ट्रात शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) यांना बरोबर घेऊन भाजपा सत्तेत आहे. पण भाजपा हाच राज्यातील व सरकारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. गुजरात तर हा अनेक वर्षांपासून भाजपाचा भक्कम किल्ला बनला आहे. या तीन राज्यांत मिळून एकूण ६७० आमदार आहेत. त्यात ३३१ आमदार भाजपाचे आहेत. ३ डिसेंबरला राजस्थानात मतमोजणी झाली. राजस्थानमध्ये भाजपाचे ११५ आमदार निवडून आले. साहजिकच या आकडेवारीत आणखी ४०ने भर पडली आहे. महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या तीन राज्यांत मिळून एकूण ९९ खासदार आहेत. त्यात ७३ खासदार हे भाजपाचे आहेत.
पूर्व भारतातील बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा या चारही राज्यांत भाजपा किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा फारसा प्रभाव नाही. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल यू, राजद, काँग्रेस यांचे महाआघाडी सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे, तर ओडिसामध्ये नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बीजू जनता दलाचे सरकार आहे. या चार राज्यांत एकूण आमदारांची संख्या ७२२ आहे. त्यात १९६ आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. तसेच या चार प्रदेशांत मिळून ११७ खासदार आहेत, पैकी ५४ खासदार हे भाजपाचे आहेत.
उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या हिंदी भाषिक राज्यात भाजपाचे संघठन मजबूत आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा व उत्तराखंड या तीन राज्यांत भाजपाचे सरकार आहे. दिल्ली-पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. या सर्व राज्यांत मिळून एकूण ८१८ आमदार आहेत. पैकी ३७७ आमदार हे भाजपाचे आहेत. या राज्यांतील खासदारांची संख्या १८९ आहे, पैकी ९८ खासदार हे भाजपाचे आहेत. मध्य भारतात छत्तीसगड व मध्य प्रदेश ही राज्ये येतात. आता दोन्ही राज्यांतील सत्ता भाजपाकडे आली आहे. या राज्यात एकूण ४२० आमदार आहेत. निवडणुकीपूर्वी या दोन्ही राज्यांत भाजपाच्या आमदारांची संख्या १४४ होती. मध्य प्रदेशात १६३, तर छत्तीसगडमध्ये ५५ आमदार भाजपाचे विजयी झाले. आमदारांच्या संख्येत ७०ची नव्याने भर पडली आहे. दोन्ही राज्यांत ४० खासदार आहेत, त्यात ३७ खासदार हे भाजपाचे आहेत.
दक्षिण भारतातील पाच राज्यांत भाजपाचे कुठेही सरकार नाही. दक्षिणेतील ५ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातून १३० खासदार येतात, पैकी २९ खासदार भाजपाचे आहेत. त्यातलेही २५ खासदार हे कर्नाटकमधून व ४ खासदार तेलंगणातून आले आहेत. या वर्षी दोन्ही राज्यांतील सत्ता काँग्रेसकडे गेली आहे. दक्षिण भारतातील एकूण आमदारांची संख्या ९२३ आहे. त्यातले जेमतेम १० टक्के आमदार भाजपाचे आहेत. दक्षिणेकडील राज्यात भाजपाची सत्ता नाही हे वास्तव आहे. कर्नाटकमध्ये भाजपाने दक्षिणेचा दरवाजा उघडला होता, पण तेथे आज काँग्रेस सत्तेवर आहे. तेलगंणात भाजपाने आपले बस्तान बसविण्यासाठी अथक प्रयत्न केले. पाच वर्षांपूर्वी भाजपाचा तेथे एकच आमदार होता. यंदाच्या निवडणुकीत ८ आमदार विजयी झाले.
तेलंगणात भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी १३ वर पोहोचली आहे, हे सुद्धा फार मोठे यश आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांचे नाव आघाडीवर आहे, ते रेवण रेड्डी हे मूळचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून तयार झाले आहेत. हिमाचल प्रदेश वगळता उत्तर भारतात कोणत्याही राज्यात काँग्रेसची सत्ता नाही. या निवडणुकीत राजस्थान व छत्तीसगड या राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली व या दोन्ही राज्यांवर भाजपाचा भगवा फडकला. निकालानंतर तेलंगणातील काँग्रेसच्या विजयापेक्षा मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील भाजपाच्या देदीप्यमान विजयाची चर्चा देशभर झाली. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी मध्य प्रदेशात दीडशेपेक्षा जास्त जागा मिळवू, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात भाजपाने १६३ जागा जिंकून काँग्रेसला धोबीपछाड केले. मध्य प्रदेशात भाजपाच्या झंजावातापुढे कमलनाथ यांचे नेतृत्व अगदीच कमी पडले. नरेंद्र मोदी-शिवराजसिंह यांनी निर्माण केलेल्या भाजपामय वातावरणात काँग्रेस शोधावी लागत होती.
छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल व टी. एस. सिंहदेव यांच्या खेचाखेचीत काँग्रेसचे नुकसान झाले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील शीत संघर्षाचा पुरेपूर लाभ भाजपाने उठवला. या सर्वच राज्यांत काँग्रेसचे प्रभारी शोभेपुरते होते. काँग्रेसची देखरेख यंत्रणा कमकुवत होती. राहुल गांधींच्या भरवशावर निवडणूक जिंकता येत नाही, एवढा जरी बोध काँग्रेसने घेतला तरी खूप शिकले, असे म्हणावे लागेल. भाजपा विरोधातील इंडिया नामक दुकानाचे शटर हिंदी भाषिक राज्यांनी बंद केले हेच निकालानंतर बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पनवतीमुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभूत झाला, असे राहुल गांधींनी उद्गार काढले होते. त्यांनी केलेली वैयक्तिक व हिन दर्जाची टीका मतदारांना आवडली नाही. त्याचा वचपा मतदारांनी निवडणुकीत काढला. यापूर्वी मोदींना ‘मौतका सैदागर’ म्हटले, नंतर ‘चौकीदार चौर है’ अशी टवाळी केली. आता मोदींना ‘पनवती’ म्हणून संबोधून राहुल गांधींनी काँग्रेसच्या पायावर धोंडा पाडून घेतला.
तीन राज्यांतील भाजपाच्या विजयाने सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची झलक दाखवली आहे. या निवडणुकींकडे सेमी फायनल म्हणून बघितले गेले. आता फायनलमध्ये विजय निश्चित आहे. २०२४ला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार व केंद्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार हाच या निकालातून संदेश आहे. ‘सपने नही हकिकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते है…’