Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सउल्लेश उल्लेखनीय रंगभूषाकार

उल्लेश उल्लेखनीय रंगभूषाकार

नंदकुमार पाटील : कर्टन प्लीज

मुंबईचा प्रत्येक प्रभाग हा एका ठरावीक, वैशिष्ट्यपूर्ण कारणासाठी ओळखला जातो. धारावी हे चामड्याच्या उद्योगासाठी जगभर ओळखले जात असले तरी ती विस्तारलेली झोपडपट्टी आहे. अस्वच्छता, गुन्हेगारी, प्रचंड माणसांची वर्दळ सारे काही धारावीबद्दल ठासून सांगितले जाते. आज प्रायोगिक, व्यावसायिक अशी रंगमंचावर ज्या रंगभूषाकारांची नावे सन्मानाने घेतली जातात. त्यात ‘उल्लेश खंदारे’ याचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. स्पर्धा कोणतीही असो हमखास स्वतःबरोबर नाटकाला पुरस्कार मिळवून देणारा तो एक कल्पक, मेहनती, सहकार्य करण्याच्या भावनेतून रंगभूषा करणारा कलाकार आहे. अल्पकालावधीत नोंद घ्यावी, असे हे काम त्याच्याकडून झालेले आहे.

महाराष्ट्राने त्याच्या कामाची दखल घेतली आहे. पण केंद्र सरकारच्या संगीत अॅकॅडमीने ‘युवा राष्ट्रीय बिस्मिल्ला खान पुरस्कार’ देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. ‘संज्या छाया’ या नाटकासाठी यंदाचा शासनाचा रंगभूषेसाठी असलेला पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. खरं तर अभिनेता म्हणून त्याला या कलेच्या प्रांतात चमकायचे होते पण त्याच्या बालपणी दुर्लक्षित धारावीत तसे काही घडत नव्हते. प्रशिक्षण, कार्यशाळा, नाट्य शिबीर सारे काही आजूबाजूच्या परिसरातच होत होते. जिथे खाण्या-पिण्याची वाताहत तिथे अस्वस्थ मने जास्त वावरत असतात. अशा वातावरणात ‘मन की बात’ बोलायचे म्हणजे पुन्हा दम देणे, डोळे वटारणे हे आलेच. लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा या विभागात जनजागृती करणे महत्त्वाचे वाटत होते. पथनाट्य हे कमी खर्चाचे हमी देणारे माध्यम तिथल्या संस्थांना, मंडळांना चालणार देणारे होते. ज्या दोन-चार संस्था सामाजिक कार्य करीत होत्या. त्यात ‘साथी कलामंच’ ही एक संस्था होती. विभागातल्या मुलांना गोळा करणे आणि त्यांच्या माध्यमातून पथनाट्याचे प्रयोग करायचे, हा या मंचाचा मुख्य उद्देश होता. जिथे उल्लेश सहभागी झाला. निर्धन, अज्ञानी लोकांत छान काही घडते म्हणताना उल्लेशला खऱ्या अर्थाने नाटकाची आवड निर्माण झाली. स्वतःचा समूह तयार केला. ‘शिवाई कला मंच’ हे त्याच्या संस्थेचे नाव. स्वतःला पडताळून पाहायचे म्हणजे या स्वप्नाळू कलाकारांसाठी त्यावेळी आणि आताही कामगार कल्याण केंद्राचे दार सताड उघडे असते. मनोरंजन करायचे आणि मेहनताना मिळवायचा या उद्देशाने संस्था पुढे जात होती. लेखक, दिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा सर्व काही करण्यात उल्लेश पुढाकार घेतो म्हणताना आजूबाजूच्या कल्याण केंद्रांनी, संस्थांनी उल्लेशला बोलावणे सुरू केले. जनसंपर्क वाढला. नाट्यकाला काय आहे, हे उल्लेशला आता कळायला लागले. त्याने कशीबशी दहावी पूर्ण केली. शिक्षणापेक्षा गुणशोधक महाविद्यालय कोणते आहे‌? याचा त्याने प्रथम शोध घेतला. तेव्हा रुईया महाविद्यालयाचा त्याला सुगावा लागला. कॉलेजबरोबर त्यांच्या नाट्यवलयमध्ये त्यांने प्रवेश मिळवला आणि ठरवले तसेच घडले. अभिनेते संजय नार्वेकर यांच्या दिग्दर्शनात ‘आलो रे बाबा’ लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सांगो वांगी’ या एकांकिकेत उल्लेश होता. आपलं ज्ञान आणि दिग्दर्शकाचे मार्गदर्शन यांचा सुरेख मेळ घातल्यानंतर उत्तम कलाकृती जन्माला येते आणि ती लक्षवेधी ठरते, ते उल्लेशने त्या एकांकिकेतून पटवून दिले. मिळवलेल्या बक्षिसावर त्याला खालून वर नजर मारावी लागते. हे जरी खरे असले तरी या धावपळीत स्वतःचा चेहरा रंगून घेणारा हा उल्लेश पुढे नकळतपणे दुसऱ्याचे चेहरे रंगवण्यात अधिक दंग झाला होता.

अभिनयाला बाजूला सारून रंगभूषेकडे लक्ष केंद्रित कर असा सल्ला वामन केंद्रे यांनी दिला. ते ज्येष्ठ नाट्य प्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे पदवीधर असल्यामुळे त्याने त्यांच्या सल्लाला प्रमाण मानले. त्याला कारण म्हणजे यांच्याकडे त्याने नाट्यप्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या ‘झुलवा’ या नाटकात दोन-चार ग्रामस्थ करण्यात त्याने पुढाकार घेतला होता. या प्रवासात उल्लेशला कामाशिवाय निवांत बसणे त्रासाचे वाटत होते. अशा स्थितीत रंगमहर्षी कृष्णा बोरकर यांच्याशी त्याची ओळख झाली. सहकार्य करण्याच्या बहाण्याने त्याने मिशा, कल्ले काढण्यासाठी त्यांना मदत केली. त्यासाठी उल्लेशला त्यांच्या बालपणाची चित्रकला कामी आली होती. पुढे विषय, भूमिका कलाकाराची त्वचा लक्षात घेऊन चेहऱ्याला रंग लावण्याचे काम वाढले होते. बोरकरांच्या जाड भिंग्यातून ‘मुलगा छान काम करतो आहे’ म्हणताना त्याला टक्कल, दाढी लावण्याची सुद्धा मुभा दिली होती. त्यातही तो तरबेज आहे, हे बोरकरांच्या लक्षात आले. विश्वासनीय सहाय्यक रंगभूषाकार होण्याचा मान उल्लेशला प्राप्त झाला झाला. त्यासाठी हवाहवाई, ऑल दि बेस्ट, शोभायात्रा यासारखे कितीतरी नाटकांसाठी त्याला उमेदवारी करावी लागली होती. आता त्याला वेद लागले होते. ‘रंगभूषाकार उल्लेश खंदारे’ या स्वतंत्र नावाची. ‘महाराष्ट्राचा मी मराठी’ या वाद्यवृंदांने उल्लेशची ही अंतरिक हाक ऐकली. त्यांनी ५० कलाकारांच्या रंगभूषेची जबाबदारी उल्लेशवर सोपवली. ही आनंदाची वार्ता त्याने गुरूंजवळ व्यक्त केली आणि गुरूंनीही फक्त तथास्तू म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. शिवाय आपल्याकडची त्यांना गुरूंनी दिलेली रंगभूषाची पेटी त्यांनी त्यावेळी सन्मानपूर्वक उल्लेशला दिली होती. मला माझ्या गुरूंनी ही बॅग दिली. ‘तू माझा शिष्य आहेस म्हणून तुला ही बॅग देताना आनंद होत आहे’. हे बोरकर यांचे उद्गार उल्लेशने कायम सोबत ठेवले आहे. उल्लेश गुरूंच्या नावाने महाराष्ट्रात वेगवेगळे ठिकाणी रंगभूषेचे उपक्रम राबवत असतो. मध्यंतरी वर्षभर कायम स्मरणात राहील, अशी गुरूंच्या नावाची त्यांची छबी असलेली दिग्दर्शिका प्रकाशित केली होती. कलाकार रंगमंचला वंदन करतो तर उल्लेश आयुष्यभर गुरूंनी दिलेल्या रंगपेटीला वंदन करीत आलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे कला जगतात गुणाढ्य पर्वत निर्माण करण्यात त्याला यश आलेले आहे. ४५ व्यावसायिक नाटके, ३८ प्रायोगिक, २२ बालनाट्य, ८१ रंगभूषा कार्यशाळा शिवाय या विषयावर मुंबई विद्यापीठापासून तर ते अन्य संस्थामध्ये व्याख्यान देणे त्याचे चालू आहे.

हा त्यांचा उंचावणारा आलेख पाहिल्यानंतर उल्लेश उल्लेखनीय काम करतो आहे असेच म्हणावे लागेल. तू तिथे मी, चाणक्य, शोधा अकबर, हॅम्लेट, अरण्यक, व्याक्युम क्लिनर, चारचौघी, प्रिया बावरी, अलबत्या गलबत्या, कापूस कोंड्याची गोष्ट ही त्याची नाटके आठवली की त्याचा रंगभूषापट नजरेसमोर यायला फारसा वेळ लागत नाहीत. हिंदीबरोबर गुजराती रंगभूमीवर तुझ्या कामाचे कौतुक झाले आहे. अभिनेते मनोज जोशी यांनी त्यांच्या नाटकाबरोबर त्यांच्या वैयक्तिक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळीही ते तुला सोबत घेऊन जातात. त्याला कारण म्हणजे तू फक्त व्यावसायिक रंगभूषाकार नाही तर माणसातले माणूसपण जपणारा रंगभूषाकार आहेस. हे अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लाडला रंगभूषाकार म्हणून तुझी स्वतंत्र ओळख या चित्र- नाट्यसृष्टीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -