मुंबई (प्रतिनिधी) : बीबीसी डॉक्युमेंटरीवरून मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूटमध्ये तणाव निर्माण झाला असून शनिवारी टीसबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीसही तैनात करण्यात आले होते.
कोलकाता व दिल्लीमध्ये वादंग निर्माण झाल्यानंतर बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचे आता मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूटमध्ये पोहोचले आहेत. शनिवारी मुंबईतील टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली. मात्र संस्था प्रशासनाने याची परवानगी दिलेली नाही. दरम्यान टीसबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले मात्र विद्यार्थी कॅम्पसमध्ये स्क्रिनिंग करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले.
टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने प्रोग्रेसिव स्टूडंट फोरमने व्यवस्थापनाकडे कॅम्पसमध्ये बीबीसी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्याची परवानगी मागितली होती. टीसने स्क्रीनिंग करण्यासाठी परवानगी देण्यास मनाई केली होती. परवानगी नसूनही फोरमने शनिवारी सायंकाळी सात वाजता डॉक्युमेंट्रीची स्क्रीनिंग करण्याची घोषणा केली.
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने डॉक्युमेंट्री प्रसारित करण्याच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. टीसने संस्थेमध्ये बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग न करण्यासंबधी नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संस्थेत अशा कोणत्याही स्क्रीनिंग आणि सभेस परवानगी नाही, ज्यामुळे शैक्षणिक वातावरण दूषित होईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.