Thursday, June 11, 2026

BMC : नगरसेवकांचे सर्व मानधन पुढील आठवड्यात होणार खात्यात जमा

BMC : नगरसेवकांचे सर्व मानधन पुढील आठवड्यात होणार खात्यात जमा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांसह १० नामनिर्देशित नगरसेवकांना (Corporators) अद्याप मानधन मिळाले नसल्याचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी स्थायी समितीमध्ये सांगत प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर टीका करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता यासर्व नगरसेवकांचे मानधन पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. २३७ नगरसेवकांपैंकी २३३ नगरसेवकांना मार्च महिन्याचे मानधन यापूर्वीच जमा झालेले असून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे मानधन देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण होवून त्यांच्या खात्यात जमा होईल,अशी माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मासिक २५ हजार एवढे मानधन दिले जात असून इतर भत्याची रक्कम यासह या मानधनाची रक्कम २८ हजारांच्या आसपास पोहोचली जाते. ११ फेब्रुवारीपासून महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २३७ नगरसेवकांना मानधन देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु हे मानधन देण्यासाठी वेंडर कोड तयार करण्यात येतो. परंतु याला नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यामुळे यामध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांनी केल्यानंतर यामध्ये सुवर्ण मध्य काढून नगरसेवकांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी आवश्यक ते प्रत्येक नगरसेवकांचे बँक डिटेल्स उपलब्ध व्हायला त्यानंतर विलंब झाला. तसेच फेब्रुवारी महिन्याचे मानधन पूर्ण महिन्याचे की २० दिवसांचे याबाबतचा निर्णय होवू न शकल्याने अखेर फेब्रुवारी महिन्याचे मानधन प्रलंबित ठेवून प्रशासनाने मार्च महिन्याचे पहिले मानधन देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.त्यानुसार आतापर्यंत २३७ पैंकी २३३ नगरसेवकांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे मानधन जमा झाले आहे. यामध्ये विशाखा राऊत आणि यामिनी जाधव या माजी आमदार असल्याने त्यांनी नगरसेवकाचे मानधन नाकारले आहे, तर तेंजिदर तिवाना यांनी आपले मासिक मानधन महापौर निधीसाठी जाहीर केल्याने प्रत्येक महिन्याचे मानधन तिथे वळवले जात आहे. तर भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या मानधनाची रक्कम काढण्यात आलेली नाही.

त्यामुळे मार्च महिन्याचे मानधन देण्यात आल्यानंतर आता एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या मानधनासाठी सचिव विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होवून नगरसेवकांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल,असे बोलले जात आहे.

सभागृहनेते हे बरं नव्हं...

नगरसेवकांना मानधन मिळाले नसल्याबाबत काही प्रमाणात नाराजी सभागृहनेते गणेश खणकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. विशेष म्हणजे गणेश खणकर हे सभागृहनेते असून सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून अशाप्रकारची नाराजी भर सभेत आणि त्यानंतर माध्यमांकडे व्यक्त केल्यामुळे विरोधकांच्या आरोपांना चांगलाचा दुजोरा मिळाला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असून भविष्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे नसतील, तिजोरी खाली झाली अशाप्रकारचे आरोप विरोधी पक्षाच्यावतीने आजवर केले जात होते. त्यातच सभागृहनेते गणेश खणकर यांनी नगरसेवकांना मानधन मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्यामुळे विरेाधकांच्या आरोपांना दुजोरा मिळाला असून विरोधक जे आरोप करत होते, त्याच बाबतची चिंता खणकर यांनी व्यक्त केल्यामुळे एकप्रकारे महापालिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. सत्ताधारी पक्षाकडूनच हा प्रश्न जाहीरपणे मांडण्याऐवजी आपल्या स्तरावर सोडवणे आवश्यक असताना खणकर यांना भान राहिले नाही. त्यामुळे सभागृहनेत्यांकडून झालेली ही चूक अक्षम्य मानली जात आहे.

Comments
Add Comment