Monday, May 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाज180 degree : १८० अंश कोनातील बदल

180 degree : १८० अंश कोनातील बदल

माझ्या जन्मापासून मी एक वाक्य ऐकते आहे – ‘जग बदलत चालले आहे.’ आपणही हे वाक्य ऐकतो… बोललोही. पण त्यादिवशी मी आईशी गप्पा मारत होते आणि आई म्हणाली की, हे वाक्य आम्हीसुद्धा नित्य वापरायचो. (180 degree) इतक्यात आजी तिथे आली आणि तीसुद्धा हेच म्हणाली.

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे आमच्या कॉलेजच्या प्रवेशद्वाराशी एक पाटी लावलेली होती त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते. ‘NO MOBILE/ मोबाइलला बंदी’ अचानकच ‘कोरोना’ नावाचे संकट आपल्यावर कोसळले. आपल्यावरच काय हो, संपूर्ण जगावर कोसळले. जन्मलेल्या मुलापासून प्रत्येकाकडे मोबाइल असणे भाग झाले. ‘जन्मलेल्या मुलापासून’ हे मला मुद्दाम लिहावेसे वाटले. कारण माझ्या माहितीतल्या सर्व आया (की सो कॉल्ड मॉम) मुलांना भरवताना समोर मोबाइलवर कार्टून्स, गाणी व तत्सम काहीतरी चालू करून ठेवतात. तेव्हा कुठे मुले काय तो पदार्थ गिळतात.

नर्सरीपासून सगळ्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल आवश्यक झाला. एका खेडेगावातल्या मुलीकडे मोबाइल नव्हता आणि तिची आई गावातल्या बऱ्या परिस्थितीतील माणसांकडे धुणे-भांड्याची कामे करायची. तिच्या आईला मुलीसाठी मोबाइल विकत घेऊन देणे परवडण्यासारखे नव्हते. मुलगी नववीत होती. तिचे ऑनलाइन शिक्षण तर बंदच झाले; परंतु तिला शाळेचा अभ्यास घेण्यासाठी शाळेतल्या परीक्षांसंबंधीची माहिती घेण्यासाठी शेजाऱ्यांचा मोबाइल वापरावा लागायचा. मोबाइल हा एक शारीरिक भागच झाल्यामुळे कदाचित शेजाऱ्यांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली असेल. नेमके काय घडले माहीत नाही, पण या मुलीने चिठ्ठी लिहिली की, मोबाइल नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ही बातमी वाचल्यावर मला इतके वाईट वाटले की, कोणालाही कळले असते की, मुलगी आत्महत्या करत आहे, तर कितीतरी माणसांनी तिला सहज नवा/जुना मोबाइल दिला असता. पण यात जर-तरच्या गोष्टी. आता एखाद्याकडे एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, हे कळण्याचा मार्गसुद्धा मोबाइल झालेला आहे. कोणी व्यक्ती हरवली, कोणाच्या वस्तू कुठे विसरल्या गेल्या, गहाळ झाल्या, कोणाला रक्ताची किंवा आणखी काही मदतीची आवश्यकता असेल, तर आपण ही सगळी निवेदनं फक्त मोबाइलवर पाहतो. कदाचित गरजू व्यक्तीला काही क्षणात खूप लोकांपर्यंत पोहोचल्याचा फायदाही होत असेल आणि दानशूर व्यक्तीलाही कोणाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, ती कळतही असेल.

तर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा एक जीव आपण वाचवू शकलो असतो, जर आपल्याला या मुलीच्या आयुष्यातील जगण्याच्या गरजेसाठीची गोष्ट मोबाइलद्वारे माहीत झाली असती!

कोरोना काळात विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेश संपूर्ण बंदी असली तरी शिक्षक म्हणून आम्हाला अधूनमधून कॉलेजमध्ये जावे लागायचे. शेवटी तो सुवर्ण दिवस उगवला आणि कोरोनाचे सावट कमी झाले. कॉलेजचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले केले गेले, अगदी गुलाबाचे फूल देऊन आम्ही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हो, त्याचे फोटोसुद्धा मोबाइल वापरून कॉलेजच्या ग्रुपवर, मित्रमंडळींच्या व्हॉट्सअॅपवर आणि फेसबुकवर ताबडतोब टाकले. फळ्यावर शिकवणे चालू झाले. पण तरीही विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक, कॉलेजमधील कार्यक्रमविषयक सूचना देणे हे मोबाइलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे चालूच राहिले. मोबाइलशिवाय तर चालण्यासारखे राहिलेच नाही, पण त्या मोबाइलमध्ये डेटा ( DATA) असणेही अतिआवश्यक झाले.

हे फक्त मी माझ्या कॉलेजविषयी लिहिले असले तरी जगभर मोबाइल हेच विश्व झाले. मग तुम्ही म्हणाल, तुमच्या लेखाचा विषय नेमका आम्हाला कुठे घेऊन जात आहे? सांगते –

आपण लेखाची सुरुवात वाचलीत कॉलेजच्या बाहेरची पाटी – ‘NO MOBILE/ मोबाइल बंदी’ ती पाटी आता नव्याने रंगवली होती आणि त्यावर लिहिले होते – ‘MOBILE IS COMPULSORY/ मोबाइल आवश्यक’ आहे ना गंमत! जग असे दोन वर्षांत इतके बदलले की, त्या पाटीवरचा मजकूर १८० अंश कोनात बदलला. जग चहूबाजूंनी बदलत आहे आणि आपल्यालाही सर्व पातळीवर तो बदल स्वीकारत बदलायची गरज आहे.

-प्रा. प्रतिभा सराफ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -