Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAxiom : तू तिथे मी...!

Axiom : तू तिथे मी…!

कॉलेजला निघताना मागून शुक शुक करून कुणी आवाज दिला, तसं मागे वळून पाहिलं, तर ती उभी, ‘तू?’ अशा प्रश्नार्थक नजरेने भुवया उंचावल्या. (Axiom) तशी ती म्हणाली, ‘मी आता रोज तुझ्याच बरोबर असणार.’ तिच्या या वाक्याने मनात धस्स झालं. ‘रोज? आणि माझ्याबरोबर, ती कशी? तुझा क्लास तर…’

‘मी बोलले ना आता मी तुझ्याबरोबरच, मग आता तुझ्याबरोबरच. तू तिथे मी.’ ‘अरे देवा! ही तर माझ्या बहिणीच्या क्लासमध्ये होती आणि आता फेल होऊन माझ्याबरोबर आलीय, म्हणजे आता माझं काही खरं नाही.’ क्लासमध्ये आल्यावर ही माझ्याच बाजूला बसली. येता-जाताही माझ्याच बरोबर फक्त आपल्या घरी राहायची तेवढीच, हिला टाळताही येईना. प्रवासातही माझ्याच बाजूला, पेंग आल्यावर माझ्याच खांद्यावर रेलायची. हे असं नको असलेलं ओझं किती वर्ष माझ्यासोबत आहे, हे मात्र कळेनासं झालं. कॉलेजला निघतानाचा प्रवास अगदी सकाळचा. अंधारातून चाचपडत स्टँड गाठायचा आणि मग प्रवासात झोपायचं.

जरा सूर्यदर्शन, नभातील रंगांची उधळण निरखावी, तर धो धो झोपेचा ओघ माझ्या खांद्यावरच आलेला असायचा. मग जाग आल्यावरचा प्रश्न ‘केस कसे आहेत, लिपस्टिक आहे ना नीट?’ ‘हो अगदी मस्त, लिपस्टिक आणि केसही. तेव्हा ती कधी कधी बोलायची, रात्रीच बांधून ठेवलेत केस. पहाटे उठून कुठे वेळ? तेव्हा मात्र कहर वाटायचा आणि लिपस्टिक, मेकअपचं काय? तो तरी सकाळीच उठून करत असणार ना? तेव्हा ती हसायची, पिकनिकच्या वेळी दोन ऑप्शन औरंगाबाद की कोल्हापूर? तिने कोल्हापूर निवडलेलं म्हणून मग हिला टाळण्याची हीच संधी म्हणून आपण औरंगाबादला प्राधान्य दिलं. चार-पाच दिवस हिच्यापासून सुटका. ट्रॅव्हल्स एकाच वेळी एकाच ठिकाणाहून सुटणाऱ्या. वेळ मात्र एकच. ठिकाणं जरी वेगळी असली तरीही मनातून तर फार आनंद झालेला. मस्त पिकनिक आणि डोक्याला तापही नाही. त्या सकाळी मी खुशीत. ती कोल्हापूर, मी औरंगाबाद. तिथूनच काही ठिकाणं फिरणार. आज ती माझ्यासोबत नाहीच म्हणून खूश होऊन आम्ही सगळे ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो असतानाच ती झपकन येऊन माझ्या बाजूला सामानासकट बसली.

‘अगं तू इथे कुठे? चुकून आलीस आमच्या इथे. तिथे त्या बाजूला लागलीय तुझी बस तिथे जा.’ तशी ती म्हणाली, ‘चुकून काही नाही, मी बरोबर आली आहे औरंगाबादसाठीच. तुला फसवलं मी. सांगताना कोल्हापूर सांगितलं एवढंच. तुझ्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. बोलले ना, ‘तू तिथं मी.’ तिचं बोलणं ऐकून मन पुन्हा धास्तावलं. ‘हे हिचं काही वेगळंच आहे, सांगते एक करते एक.’

त्यानंतर पुरी पिकनिक ‘तू तिथे मी’ अशीच गेली. काय काय पर्यटन स्थळं पाहिली हे टिपून ठेवण्यासाठी मॅडमनी डायरीत सारा इतिहासच लिहिला. म्हणाली, ‘प्रोजेक्टसाठी सारं उपयोगी पडेल. प्रोजेक्टची तयारी आतापासूनच करायला हवी. तुला माहीत नसेल म्हणून सांगते’, असं बोलून तिने मला काही नवीन माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. कुणीही हे असं काही नमूद केले नाही आणि ही कोल्हापूर सोडून औरंगाबादचा इतिहास लिहायला माझ्यासोबत ‘तू तिथे मी’ म्हणत आली. पिकनिक झाल्यावर पुन्हा कॉलेज. त्यानंतर खरंच प्रोजेक्टची तयारी. हिचा प्रोजेक्ट सगळ्यांच्या आधीच तयार असणार आहे, हे आम्हाला न सांगताच कळलेलं. आम्ही आमच्या परीने प्रोजेक्ट केले. प्रोजेक्ट जमा करायची तारीखही जवळ आलेली. मग मनासारखा प्रोजेक्ट तयार करून झाले एकदाचे काम म्हणून सुस्कारा टाकला. पण दुसऱ्या दिवशी बॅग भरताना प्रोजेक्ट बुक काही सापडेनाशी झाली? काय झालं, कुठे गेली असेल म्हणून शोधाशोध केली, निघायला लेट होऊ लागलेला, तशी आई म्हणाली, ‘अगं तुझी प्रोजेक्ट बुक तुझी मैत्रीण घेऊन गेली. तिचा प्रोजेक्ट झाला नाही, असं काहीतरी म्हणत होती.’

‘काय, तिला कशाला दिली? आज जमा करायची होती. आणि तिला कशाला हवी? ती तर केव्हापासून प्रोजेक्टच्या तयारीला लागली होती.’ ‘नको काळजी करू, आज आणते म्हणालीय कॉलेजला.’

झटपट तयारी करून कॉलेजला जायला निघाल्यावर पाहिलं, तर नेमका गोंधळच. ती कुठेही दिसली नाही. हिने आज चक्क प्रोजेक्ट द्यायचा म्हणून सुट्टी घेतली की काय? आता मी कशी देणार प्रोजेक्टची बुक? माझा प्रोजेक्ट तयार असूनही केवळ हिच्यामुळे आज वेळेवर देता येणार नाही, याची खंत लागून राहिली. आज सगळ्यांच्या बुक जमा होणार आणि आपली मात्र नाही. हा विचार करून मन सुन्न झालं. ही अशी कशी? वेंधळी!

पिकनिकच्या वेळेपासून प्रोजेक्टचा ध्यास घेतला होता तिने आणि आज प्रोजेक्ट जमा करायची वेळ आली, तर आपल्यासोबत मलाही टांगायला निघाली. ‘तू तिथे मी’ म्हणताना ही आता आपल्यासोबत मलाही तोंडघशी पाडणार तर. मनातून फार राग आलेला. पण काहीच बोलता येईना.

त्यानंतर कॉलेजच्या पायऱ्या चढताना पाहिलं, तर पहिली बस आमचीच आलेली. कुणाचीही बस नाही की कुणी विद्यार्थी नाहीत. सकाळच्या वेळी जरा झोपेतच पायऱ्या चढताना नकळत लक्ष गेलं, तर समोर ‘ही’ उभी.

‘अगं तू, तू कशी… आणि कधी आलीस, कोणत्या बसने आलीस? पहाटे आलीस की काय?’ तशी ती शांतपणे म्हणाली, ‘मला कळलंच नव्हते किती वाजले ते. पहाटेची पहिली बस पकडून चुकून आले इथवर’ ‘आलीस ना आता, माझी प्रोजेक्ट बुक दे पहिली.’ माझा स्वार्थ. ‘विसरले गं, प्रोजेक्ट करता करता बुक बॅगेत भरायची राहिली आणि तिथेच राहिली.’ तिचं उत्तर. शांतपणे आणि निर्विकारपणे तिने दिलेलं उत्तर पाहून आणि तिने वेंधळेपणाचा गाठलेला कळस पाहून क्षणभर डोकं सुन्न झालं आणि तिच्यासोबत अजून किती गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, याचं गणित मांडत बसले.

-प्रियानी पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -