Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीओमायक्रॉनमुळे फेब्रुवारीत येणार कोरोनाची तिसरी लाट

ओमायक्रॉनमुळे फेब्रुवारीत येणार कोरोनाची तिसरी लाट

कोविड पॅनलकडून धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोविड सुपरमॉडेल पॅनलने चिंतेत भर टाकणारी माहिती दिली आहे. भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे २०२२ च्या सुरुवातीलाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू असू शकतो, अशी भीतीदेखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

सध्या भारतात दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या ७,५०० पर्यंत गेली. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टाची जागा घेतल्यानंतर हा आकडा आणखी वाढून भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशी माहिती नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीच्या सदस्याने दिली.

नॅशनल कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीचे प्रमुख विद्यासागर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, “भारतात ओमायक्रॉनची तिसरी लाट येऊ शकते, पण ती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. ही तिसरी लाट फेब्रुवारी २०२२ मध्ये येण्याची शक्यता आहे. देशभरातील नागरिकांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ही लाट सौम्य असेल. सध्या भारतात दररोज जवळपास साडेसात हजार नवे रूग्ण आढळत आहेत. मात्र, ओमायक्रॉन विषाणूने डेल्टा विषाणूची जागा घेण्यास सुरुवात केल्यानंतर नव्या रूग्णांची संख्या वाढेल.” असे त्यांनी म्हटले आहे.

“सेरो सर्वेक्षणानुसार आता डेल्टा विषाणूच्या संपर्कात आले नाहीत असे खूप कमी लोक आहेत. सध्या नागरिकांमध्ये ७५ ते ८० टक्के लोक डेल्टाच्या संपर्कात येऊन त्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली. याशिवाय ८५ टक्के प्रौढांना कोरोनाचा एक डोस, तर ५५ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. यामुळे खूप कमी लोक आता विषाणूच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळेच तिसऱ्या कोरोना लाटेत दुसऱ्या लाटेइतके अधिक रूग्ण आढळणार नाहीत,” असे विद्यासागर यांनी सांगितले. याशिवाय आपण आरोग्य यंत्रणाही तयार केलीय. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करणं फारसे अवघड जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -