Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणनेरुळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील वर्षी सप्टेंबरपासून सुरू

नेरुळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील वर्षी सप्टेंबरपासून सुरू

मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात

घनःश्याम कडू

उरण : मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण ही उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यातील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती दिली जात असून ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला आहे; परंतु, भूसंपादनासह अनेक अडथळ्यांमुळे नेरुळ ते उरण संपूर्ण प्रकल्प रखडला. यातील पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. तथापि, खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी प्रकल्पासाठीचा एकूण ५०० कोटींचा खर्च सुमारे १७०० कोटींपर्यंत पोहोचला.

खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. यात सिडकोकडून तीन किलोमीटरची जागा रेल्वेला मिळणे बाकी होती. त्याचे भूसंपादन पार पडले आणि ती जागा रेल्वेला मिळाली. त्यामुळे मोठा अडसर दूर झाला असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण मार्गिकाही पूर्ण करून सप्टेंबर २०२२ पासून नेरुळ ते उरण संपूर्ण उपनगरीय मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती देण्यात आली.

एकूण २७ किमी लांबीच्या मार्गातील १४.६० किमीचे काम शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेत खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्ये हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला असून प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ व उरणवासीयांबरोबरच अन्य प्रवाशांनाही त्याचा बराच फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि येत्या काळात तयार होणारे नवी मुंबई विमानतळही जोडले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -