Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपाणीटंचाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक

पाणीटंचाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक

पालिका आयुक्तांच्या दालनात शानू पठाण यांचे ठिय्या

ठाणे (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून कळवा-मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. चार-चार दिवस पाणी नसतानाच दूषित पाण्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दूषित पाण्यासह थेट पालिका आयुक्तांचे दालन गाठून ठिय्या आंदोलन केले.

तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ठाणे शहरासह राज्यभर शाळा सुरु झालेल्या असतानाही प्रत्यक्ष महासभा घेतली जात नाही. ठाणेकरांचे प्रश्न सभागृहात मांडले जाऊ नयेत, यासाठीच प्रत्यक्ष महासभा होत नसल्याचा आरोप करीत ठाणे पालिकेच्या महासभेतच कोरोना येतो का?, असा सवालही यावेळी पठाण यांनी केला.

सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु ते सुरू असताना वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपात निर्माण झाली आहे. याच पाण्याच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतरही या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.

दरम्यान, पाण्याच्या याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाण्याची टंचाई असलेल्या भागाची पाहणी करुन दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचे प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -