Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकर्जत चारफाटा येथील अतिक्रमणावर हातोडा

कर्जत चारफाटा येथील अतिक्रमणावर हातोडा

नारी शक्ती संघटनेच्या आमरण उपोषणाला यश : नागरिकांमध्ये समाधान

कर्जत (वार्ताहर) : मुरबाड राज्यमार्गावरील चारफाटा येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवावीत यासाठी नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण केले होते. तसेच, त्यानंतर पाठपुरावाही सुरूच ठेवल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने या दुकानांवर हातोडा फिरवला. त्यामुळे कर्जतकरांनी समाधान व्यक्त केले.

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अक्षय चौधरी चारफाटा येथे कारवाईसाठी आले असता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते जमवत अतिक्रमण कारवाईला जोरदार विरोध दर्शवला. दुसरीकडे काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईचे समर्थन करत अतिक्रमण हटवली गेली पाहिजेत, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह दिसून आले.

कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कर्जत चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात बेकायदा हॉटेल्स, दुकाने उभारण्यात आली आहेत. येथून ये-जा करणारे वाहनधारक नाश्त्यासाठी, खरेदी करण्यासाठी रस्त्यातच वाहने उभी करत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. अगदी रुग्णवाहिकेलाही या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे सदर अतिक्रमण हटवण्याची मागणी कर्जतकरांच्या वतीने नारी शक्ती संघटनेने आमरण उपोषण करून केली होती. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे हटवण्यास चारफाटा येथे आले असता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकत अतिक्रमण तोडण्यास तीव्र विरोध केला. घारे यांच्या कृतीवर कर्जतकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वाहतुकीस अडथळा 

कर्जत चारफाटा हा चौक असून येथून कर्जत-मुरबाड, कर्जत-नेरळ-माथेरान, कर्जत-भिसेगाव रेल्वेस्थानक, कर्जत-चौकमार्गे मुंबई, पुणे महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यात मुरबाड एमआयडीसीकडे जाणाऱ्या मालवाहू अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे हे अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा ठरत आहे.

कर्जत राष्ट्रवादीतच दोन गट?

माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी नारी शक्तीच्या उपोषणाला पाठिंबा देत अतिक्रमण हटवण्यास जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र, त्यांच्याच पक्षाचे सुधाकर घारे यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करत दबाव टाकल्याने घारे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला सुरू झाल्या.

२०१८ पासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. आज (गुरुवारी) जी कारवाई करण्यात येत आहेत ती फक्त चारफाटा येथील ब्लॅक स्पॉट लिस्टमध्ये नावे असणाऱ्या अतिक्रमणधारकांवरच करण्यात येणार आहे. – अक्षय चौधरी, उपअभियंता, सा. बां. विभाग कर्जत

कर्जत हे पर्यटक केंद्र म्हणून विकसित होत आहे. तसेच, चारफाटा हे कर्जतचे मुख्य प्रवेशद्वार आहे. भविष्यात कर्जत हे पर्यटन केंद्र म्हणून अधिक नावारूपाला येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. त्यामुळे कर्जत शहरात प्रवेश करणारा तसेच नेरळ-माथेरानकडे जाणारा रस्ता प्रशस्त खुला असावा. – महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत विधानसभा मतदार संघ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -