Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीनवी मुंबईतील वातानुकूलित बसेसना घरघर

नवी मुंबईतील वातानुकूलित बसेसना घरघर

चालत्या बस रस्त्यातच पडतात बंद

नवी मुंबई : नवी मुंबईत वातानुकूलित बसेस मनपा परिवहन उपक्रमाकडून कार्यान्वित करण्यात आल्या. त्याविषयी नागरिकांनी तसेच प्रवाशांनी देखील परिवहन उपक्रमाचे कौतुक केले; परंतु आता याच बसेसची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने बसेस नादुरुस्त होण्याच्या घटनांना वेग आला आहे. त्यामुळे कौतुक करणारे प्रवासीच आता परिवहन उपक्रमावर टीकास्त्र करत आहेत.

निळयाभोर दिसणाऱ्या बसेस शहराला शोभून दिसत आहेत. नवी मुंबईमधील स्वच्छ, सुंदर रस्त्यावर पळताना या बसेस अकर्षकतेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रवाशांचा उदंड प्रतिसाद देखील त्यांना लाभताना दिसून येत आहे; परंतु एक ते दीड वर्ष पूर्ण कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच या बसेसना काहीना काही आजाराने त्रासले असल्याचे सामोरे आले आहे.

मनपा परिवहन उपक्रमात एकूण १८० बसेस असून त्यामध्ये १०५ मोठ्या बसेस, तर ७५ छोट्या बसेस आहेत. या सर्व बसेस उपक्रमाच्या तीनही आगारात प्रवाशांना सेवा देत आहेत. पण आज या बसेस कोणत्याही ठिकाणी बंद पडत आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

बसेसमधील असलेले अंतर्गत साहित्य तुटणे, बसेसच्या इंजिनचा आवाज मोठा येणे, मध्येच पंक्चर होणे, इंजिन नादुरुस्त होणे या प्रकाराला प्रवासी कंटाळले आहेत. अनेकदा बसेस रस्त्यावर बंद पडली, तर दुरुस्त करता येत नसल्याने टोचन लावून न्यावे लागत आहे. यामुळे प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत.

बसच्या इंजिनातून हेलिकॅप्टरसारखा आवाज…

घणसोलीहून कोपर खैरणेकडे धावणाऱ्या बसेसच्या इंजिनामधून मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

ठेकेदारांना सूचना दिल्या जातील- योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम

बसेस सुस्थितीत कशा राहतील याकडे आमचे लक्ष आहे; परंतु जर बसेस नादुरुस्त होत असतील, तर चौकशी करून ठेकेदारांना सूचना दिल्या जातील.
योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -