Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड

मुंबई : मुंबईत गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या अनेकदा दिल्या गेल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारे ट्विट मुंबई पोलिसांना मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आणि अवघ्या काही तासातच पोलिसांनी धमकी देणाऱ्या श्रीपाद गोरठकर या १९ वर्षीय माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतले.

श्रीपाद गोरठकर हा नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो नांदेड शहरात राहत होता. दोन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांने त्याच्या ट्विटर हँडलवरून मुंबईत विध्वंसक कारवाई करण्याची धमकी देणारे ट्विट केले होते. हा मेसेज मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग करण्यात आला होता. ही बाब मुंबईच्या सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या निदर्शनास आली. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबईच्या सीआययू युनिटने तात्काळ कारवाई करत मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला आणि तो युवक नांदेडमधील नावंदी येथील रहिवासी असल्याचे आढळून आले.

मुंबई पोलिसांनी तातडीने नांदेडचे पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे यांना या संदर्भात माहिती दिली. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नायगाव पोलिसांच्या मदतीने तरुणाच्या घरावर छापा टाकून तरुणाला ताब्यात घेतले. त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस मुंबईला घेऊन आले आहेत.

दरम्यान, ट्विटरवर आक्षेपार्ह संदेश टाकण्यामागे या तरुणाचा हेतू काय होता आणि तो मुंबईत कोणते विध्वंसक कृत्य करणार होता, हे तपासात उघड होईल. मात्र या तरुणाच्या या कृत्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -