Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरतलासरीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

तलासरीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

तारपा, आदिवासी नृत्याविष्काराने परिसर गजबजला

सुरेश काटे

तलासरी : आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेल ही मात्र याच आदिवासीच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम डोंगरी जंगलात वास्तव्य करणाऱ्या दुर्लक्षित आदिवासी समाजाकडे तसेच एक महत्वाच्या समूहाकडे आणि परिसराकडे ज्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी युनेने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केले. संपूर्ण देशासह आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.

तलासरी मध्ये ही आदिवासी पारंपारिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य, तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन विद्यार्थ्यांकडून घडविण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तलासरी तालुक्यातील कॉ. गोदावरी परुळेकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, नथु ओझरे महाविद्यालय इत्यादी शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपारिक वेश परिधान करून थाटामाटात मिरवणूक काढली.

एकमेंकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर, लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले. यावेळी मुख्य बाजारपेठ ‘जय आदिवासी”, बिरसा मुंडा की जय” अश्या घोषणांनी घुमून उठला होता. महाविद्यालयीन तरुण तरुणीचा विविध गट मिरवणुकीत टप्याटप्यावर तालबध्द आणि मनमोहक आदिवासी कला अविष्कारांचे सादरीकरण करीत असल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी तलासरी तील नागरिकांनी गर्दी केली होती.

आदिवासी संस्कृती व परंपरा, कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी, समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा, निसर्गाशी नाते अतूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडवा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर, दऱ्या-खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तलासरी पोलिंसाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -