Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर

देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करीत आहे. निवडणुकीला सामोरे जात आहे. विकासाचा दृष्टिकोन कसा आहे, कोणत्या धर्तीवर आपल्या भागाचा विकास केला जाईल. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी अन्य सर्व गोष्टींपेक्षा भविष्यात मतदारसंघातील जनतेला कसा विकास दाखविला जाईल, त्याचे नियोजन कसे असेल, या सर्वांविषयी माहिती दिली जाईल. जनतेला विश्वास दिला जाईल, अशी अपेक्षा असते; परंतु तसे काही घडताना दिसत नाही. आपण काय केलं? यापुढे काय करणार? हे सांगण्याची जबाबदारी पक्षीय नेत्यांची आहे. जनतेला भावनिकदृष्ट्या आवाहन करून मतं मागता येतील; परंतु भावनिकतेचा मतदार किती प्रभावित होऊन विचार करतील हा खरंच प्रश्न आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणात येऊन गेले. पुन्हा शुक्रवारी कोकणात येतील. कोकण, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक अतूट नातं होतं. कोकणातील मुंबईस्थित अनेक तरुणांना शिवसेनेच्या प्रवाहात आणून महाराष्ट्राच्या सामाजिक सेवेत रक्तदान, आरोग्य शिबीरसारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांनी जोडले गेले.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असं शिवसेनेचं समीकरण होतं. १९९५ नंतर शिवसेनेचं समाजकारणाचं समीकरण थोडं-थोडं बिघडत गेलं आणि २०१९ मध्ये शिवसेनेचं राजकीय समीकरण पूर्णच बिघडलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्तापदावर कधीच विराजमान झाले नाहीत. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपाची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब ठाकरे सहज विराजमान होऊ शकले असते. सत्तेचे गणित जुळवत असते, तर बाळासाहेब केंद्रातही असते; परंतु सत्तापदाच्या पलीकडे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं अढळ सिंहासन होतं. मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा प्रचंड विश्वास होता. शिवसेनाप्रमुख आधारवड वाटायचे.

कोकण आणि शिवसेनेचं एक अतूट नातं होतं. याच भावनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणभूमीला मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवरच्या जाहीर सभेत साष्टांग दंडवत घातले होते. कोकणच्या जनतेच्या नात्याची विण अधिक घट्ट झालेली, तेव्हा त्या सभेला जे-जे उपस्थित होते त्या व्यासपीठावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदरभावाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या प्रसंगाचा एक पत्रकार म्हणून मी साक्षीदार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी उपस्थित सारा जनसमुदाय नेहमीच प्रेरित व्हायचा; परंतु मालवणच्या त्या बोर्डिंग ग्राऊंडवरच्या सभेतील साष्टांग दंडवत या प्रसंगाची एक किनार होती. नंतरच्या काळात शिवसेनेत पक्षप्रमुख पद आलं आणि बदललेल्या शिवसेनेचे चेहरे आणि मुखवटे जनतेसमोर यायला लागले. मागच्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणात आले. कोकणातील जनतेसमोर त्यांनी भाषण केलं. त्यात कोकणच्या विकासाचा विषयच नव्हता.

कोकण आहे तिथेच आणि आहे तसंच राहावं असच काही जणांना वाटतंय हे दुर्दैव आहे. शिवसेनेचे कोकणशी असलेले नाते उलगडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यासाठी भावनिकपणे कुटुंबाचे हृदय कोकणशी कसे जोडले गेलेले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु कोकण आणि शिवसेनेचं नातं टिकवण्यासाठी जे प्रयत्न करण्याची आवश्यकता होती तसं काहीच घडलेलं नाही. उलट ज्या अडीच वर्षांत मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते त्या कार्यकाळातही कोकणसाठी वेगळं काहीच केलं नाही. काही घडलं नाही. आश्वासनांचा मात्र नेहमीच सुकाळ होता. सिंधू-रत्नची स्थापना करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकण दौऱ्यात घोषणा केली; परंतु त्यासाठी एक रुपयाचीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. पर्यटन व्यवसायाला चालना देणाऱ्या गावगप्पा फार झाल्या; परंतु त्याचं पुढे काहीच झालं नाही. कोणतंही नातं हे नुसत्या मालवणी भाषेत सांगायचं तर ‘सुक्या गजाली’ने टिकवलं जात नाही.

कोकणच्या जनतेने शिवसेनेवर विश्वास टाकला. निवडणुका आल्या की कोकण उद्ध्वस्त होईल अशी भीती आणि अफवा कोण पसरवतो. कोकण उद्ध्वस्त व्हायला कोण देणार, कोकणची जनता स्वत: सक्षम आहे; परंतु अशी काही वातावरण निर्मिती केली जाते की, सर्वकाही तारणहार आपणच आहोत असा आभास निर्माण केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. यामुळे कोकणात कुठला उद्योग उभा राहू शकला नाही. की व्यवसायात समृद्धी येऊ शकली नाही. याचं एक प्रमुख कारण असं आहे की, सातत्याने कोकणवासीयांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. बरं यात सगळं राजकारणच असतं. कोकणवासीयांच्या इथल्या भल्या-बुऱ्याची, काळजीपोटी यातलं काहीच चाललेलं नसतं.

राजकीय ‘इश्यू’ बनवायच्याक चर्चा घडवायची, निवडणुका संपल्या की असे राजकीय ‘इश्यू’ देखील संपवून जातात. पुन्हा त्या विषयांची चर्चा निवडणूक काळात केली जाते हे कोकणवासीयांचे दुर्दैव आहे. कोकणची जनता मात्र अशा अफवा आणि फसवेगिरीला आजवर अनेकवेळा फसत आली आहे. यामुळे विकासाची चर्चाच होत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजवर जेव्हा-जेव्हा कोकणच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्या प्रत्येकवेळी एकतर वैयक्तिक टिका किंवा जनतेचा बुद्धिभेद या दोन गोष्टींवरच त्यांचा भर असतो. यामुळे कोकणात आल्यावर कोकणच्या विकासासंबंधी कोकणच्या समृद्धीच्या विचारावर चर्चाच केली जात नाही. दुर्दैवाने तरीही कोकणच्या जनतेला याचं वैक्षम्य वाटत नाही. याचही काहींना आश्चर्यच वाटतं.

कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं जपण्यासाठी निव्वळ शब्द फुलाऱ्यांनी नाती जपली जात नाहीत. जिव्हाळा या शब्दातच भावनिकता आणि ओलावा आहे; परंतु शब्दातील कोरडेपणाने कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होत नाही. कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होण्यासाठी समाजाची बांधिलकी देखील महत्त्वाची असते. तरच कौटुंबिक जिव्हाळा कायम राहतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -