Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGondavlekar Maharaj : कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे

Gondavlekar Maharaj : कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने, त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे. म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो, हे काही खरे नाही. तसे जर असते, तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून, भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले, तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो, तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरिता उपवास करणे, ही गोष्ट मला पसंत नाही.

उपवास ‘घडावा’ यात जी मौज आहे, ती उपवास ‘करावा’ यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की, आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत, असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले? या उलट आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले, तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही.

काही लोक वेडे असतात, त्यांना आपण उपासतापास कशासाठी करतो आहोत, हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून, एखादे वेळी कृती बरी नसली, तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली, तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून, तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला, तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. ‘भगवंतासाठी भगवंत हवा’ अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ‘तुला काय पाहिजे?’ असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’ हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण रुपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता, भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.

तात्पर्य : जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास ।
कृपा करील रघुनाथ खास॥

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -