Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीMahaparinirvan Movie : काय आहे 'महापरिनिर्वाण'? प्रसाद ओकचा गंभीर आवाज आणि लाखोंचा...

Mahaparinirvan Movie : काय आहे ‘महापरिनिर्वाण’? प्रसाद ओकचा गंभीर आवाज आणि लाखोंचा जनसमुदाय…

महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) आज भारतासह जगभरात आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले जात आहे. याच दिवसाचे औचित्य साधून ‘महापरिनिर्वाण’ या नव्या मराठी सिनेमाचा (Mahaparinirvan Movie) फर्स्ट लूक (First Look) शेअर करण्यात आला आहे. ‘महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट’ असं या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे. समाजसुधारक राजकारणी आणि चित्रपट निर्माते नामदेवराव व्हटकर (Namdev Vhatkar) यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास उलगडणारा सत्यघटनेवर आधारलेला हा चित्रपट (Based on true story) असणार आहे.

या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ‘महापरिनिर्वाण’ या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. धर्मवीरनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) ‘महापरिनिर्वाण’ सिनेमातून मोठी भूमिका साकारणार आहे, याची चर्चा होती. आज या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला असून त्यात प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असल्याचे समजत आहे. प्रसादने या चित्रपटामध्ये नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. सोबतच हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेचीही (Gaurav more) एक झलक पाहायला मिळते.

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील लाखो लोकांची गर्दी दिसते. “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय.” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी लक्ष वेधून घेतले आहे. गौरव मोरेची भूमिका काय असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही. शिवाय फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा कलाकार पाठमोरा उभा असलेला दिसतो. त्यामुळे त्या कलाकाराचीही ओळख पटू शकलेली नाही.

कल्याणी पिक्चर्स व अभिता फिल्म प्रोडक्शन यांनी ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माते सुनील शेळके तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत. शैलेंद्र बागडे यांनी दिग्दर्शन केले आहे. गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली असून त्यांना संगीत देण्याची जबाबदारी विजय गावंडे यांनी सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे वेशभूषाकार चंद्रकांत सोनावणे आणि कलादिग्दर्शक नितेश नांदगांवकर आहेत. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कोण आहेत नामदेवराव व्हटकर?

नामदेव लक्ष्मणराव व्हटकर हे ध्येयवेडे समाजसुधारक राजकारणी आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचे चित्रीकरण त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी प्रसंगी स्वतःची प्रेस आणि घरही विकले होते. बाबासाहेबांची ही आठवण त्यांनी जतन केल्याने जो-तो नामदेव व्हटकरांसमोर नतमस्तक होईल. त्यांच्या कहाणीवर आधारलेल्या या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘परिनिर्वाण’ असे ठेवण्यात आले होते. नंतर ते बदलून महापरिनिर्वाण करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -