Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंची वाटचाल चुकीच्या मार्गाने : किर्तीकर

उद्धव ठाकरेंची वाटचाल चुकीच्या मार्गाने : किर्तीकर

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी दुसरा गट स्थापन केला तरी मी ठाकरे गटात प्रतीक्षा करत होतो. आम्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचा प्रवास हा शिवसेनेसाठी घातक आहे. यामुळे शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आहे. आम्हाला वाटले होते, या धोरणात बदल होईल, पण तसे काही झाले नाही. वारंवार सांगूनही त्यांनी आमचे ऐकले नाही. उद्धव ठाकरे हे चुकीच्या मार्गाने जात आहेत, असा हल्लाबोल शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला आहे.

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच १९९० ते २००९ या काळात चार वेळा ते आमदार राहिले आहेत. यानंतर ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

मी गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत आहे, मी पक्षाचा निष्ठावंत होतो. तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप गजानन किर्तीकर यांनी केला. २००४ मध्ये उद्धव ठाकरे यांना मालाड विधानसभा मतदारसंघात माझ्याऐवजी एक उत्तर भारतीय बिल्डर व्ही. के. सिंग याचा भाऊ रमेश सिंग याला उमेदवारी देण्याच्या विचारात होते. त्यांच्यात सुरु असलेल्या गुफ्तगूची माहिती मला मिळत होती. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तसे होऊन दिले नाही.

२००९ मध्ये मला निवडणुकीचे तिकीट देण्यात आले नाही. माझा पीए सुनील प्रभूला उद्धव ठाकरे सारखे मातोश्रीवर बोलवून घेत होते. मी तुलाच तिकीट देणार, किर्तीकरांना देणार नाही, असे उद्धव ठाकरे सांगायचे. एवढा मोठा पक्षप्रमुख पण अशा पद्धतीने विचार करायचा, अशी टीकाही गजानन किर्तीकर यांनी केली आहे.

तर २०१९ मध्ये एनडीएमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद आले होते. ते मंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना दिले. अशावेळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मर्जीतील माणसे आठवतात. गजानन किर्तीकर यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आठवत नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांना माझं नाव लक्षात आले नाही का, असा सवालही गजानन किर्तीकर यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -