Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबिजू जनता दल, एनडीएच्या दिशेने

बिजू जनता दल, एनडीएच्या दिशेने

ओरिसामध्ये वर्षानुवर्षे सत्तेवर असलेला बिजू जनता दल हा पक्ष एनडीएमध्ये सामील होण्यासाठी सकारात्मक आहे. काँग्रेस आणि इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीत जाण्याऐवजी भाजपाप्रणीत एनडीएमध्ये जाणे अधिक चांगले असा विचार बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांनी केला असावा. नवीन पटनाईक हे ओरिसाचे मुख्यमंत्री असून काँग्रेस व भाजपापासून ते अनेक वर्षे अंतर ठेऊन होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांचा पक्ष एनडीएमध्ये मित्रपक्ष म्हणून सहभागी होता, आता पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बिजू जनता दलाची वाटचाल एनडीएच्या दिशेने सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिजू जनता दलाच्या या निर्णयाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या भुवनेश्वरमधील निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी झालेल्या पक्षाच्या बैठकीतच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला. बिजू जनता दल व भाजपा यांची गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. बिजू जनता दलाचा कल एनडीएकडे झुकण्याचा आहे हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत देशाने केलेली चौफेर प्रगती तसेच मोदींचा सर्व देशभर असलेला करिष्मा यामुळे बिजू जनता दलाने भाजपाच्या विरोधात निवडणुका लढविण्याऐेवजी भाजपासोबत निवडणूक लढवावी असा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे देशात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे देशात जवळपासही कोणी नाही, हे वास्तव आहे. अशा वेळी मोदींच्या नेतृत्वाला साथ देऊन देशाच्या व राज्याच्या विकासासाठी एनडीएमध्ये सामील होणे योग्य ठरेल असा विचार बिजू जनता दलाने केला. बिजू जनता दलाचे उपाध्यक्ष देबी प्रसाद मिश्रा यांनी, आमचा पक्ष ओरिसाच्या लोकांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेईल असे म्हटले आहे. भाजपाचे खासदार जुअेल ओराम यांनीही ओरिसात भाजपा-बिजू जनता दल युती होणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेईल अशीही पुष्टी जोडली आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला राज्यात ४३.३ टक्के मते मिळाली होती, तर भाजपाला ३८.९ टक्के मतदान झाले होते. काँग्रेसच्या पदरात अवघी १४ टक्के मते पडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचे १२ खासदार निवडून आले, भाजपाचे ८, तर काँग्रेसचा केवळ एकच खासदार विजयी झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला ४५.२ टक्के मतदान झाले व १४७ सदस्यांच्या विधानसभेत बिजू जनता दलाचे १२१ आमदार निवडून आले. त्यानंतर भाजपाचे २३ व काँग्रेसचे केवळ ९ आमदार विजयी झाले. ओरिसामध्ये नवीन पटनाईक यांचे नेतृत्व व त्यांचा बिजू जनता दल हा पक्ष यांची जनतेवर जबरदस्त पकड आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. म्हणूनच भाजपालाही लोकसभा निवडणुकीसाठी बिजू जनता दलाची मैत्री हवी आहे.

महिनाभरापूर्वीच बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री नितीशकुमार हे काँग्रेस व राजद बरोबरची युती तोडून भाजपाप्रणीत एनडीएमध्ये परत आले, आता पंधरा वर्षांनंतर नवीन पटनाईक भाजपाकडे परत येत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेड व बिजू जनता दल हे दोन प्रादेशिक सत्ताधारी पक्ष भाजपाकडे आकर्षित झाले, याचा निश्चितच लाभ भाजपाला व त्या दोन्ही पक्षांना होईल. या दोन्ही घटना काँग्रेस व इंडिया या विरोधी आघाडीसाठी धक्कादायक आहेत. ओरिसामध्ये लोकसभेच्या २१ जागा आहेत व विधानसभेच्या १४७ जागा आहेत. या दोन्ही निवडणुकीसाठी बिजू जनता दल व भाजपा यांची युती होऊ शकते व त्याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो.

भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपाची केंद्रात दहा वर्षे सत्ता आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याची हॅटट्रीक करणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. मोदी की गॅरेंटी या मंत्राने देश भारावून गेला आहे. मोदीच आपला आधार, मोदीच आपले तारणहार, मोदी हेच विकासाचे दुसरे नाव, अशी धारणा सामान्य जनतेची आहे. विकासाच्या वाटचालीत आपण वेगळी चूल मांडण्यापेक्षा भाजपाला साथ देऊन आपल्या राज्याचेही भले करू या, असा विचार नितीशकुमार यांनी केला व तोच विचार नवीन पटनाईक यांनी केला आहे. बिजू जनता दलाचे राज्यसभेत नऊ खासदार आहेत, बिजू जनता दल एनडीएमध्ये सामील झाल्यावर राज्यसभेतही एनडीएचे संख्याबळ वाढणार आहे.

भाजपाच्या अबकी बार ४०० पार या घोषणेला नवीन पटनाईक यांच्या निर्णयामुळे व बिजू जनता दल एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे मोठे बळ प्राप्त होणार आहे. १९९८ मध्ये भाजपा व बिजू जनता दल युती होती. सन २००९ मध्ये ती तुटली. दोन्ही पक्षांनी १९९८, १९९९ आणि २००४ अशा लोकसभा निवडणुका एकत्रपणे लढवल्या. शिवाय सन २००० व २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकाही दोन्ही पक्ष युती करून लढले होते. खरं तर बिजू जनता दल हा एनडीएमधील विश्वासू घटक पक्ष होता. पण सन २००९ मध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली. ओरिसात भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी अधिक जागांसाठी आग्रही राहील व विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला अधिक जागा देईल, असा समझोता होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -