Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलगोष्ट एका शास्त्रज्ञाची

गोष्ट एका शास्त्रज्ञाची

लहानग्या रघुनाथला आईचे मन आणि तिचे कष्ट दिसत होते. तो अगदी मन लावून अभ्यास करायचा. उत्तम गुण मिळवून पास व्हायचा. पण आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, याचे उत्तर मात्र त्याला सापडत नव्हते आणि मग तो प्रसंग घडला, जो माशेलकरांचे जीवन ध्येय ठरवून गेला.

कथा – रमेश तांबे

बाल मित्रांनो, ही गोष्ट आहे भारताचे थोर शास्त्रज्ञ श्री रघुनाथ माशेलकर यांची! माशेलकरांचे बालपण खूपच गरिबीत आणि कष्टात गेले. त्यांच्या वडिलांचे लवकर निधन झाल्याने घराची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. त्या गोव्यातील आपले माशेल गाव सोडून मुंबईत आल्या आणि तेथेच छोटी मोठी कामे करून आपले जीवन जगू लागल्या. मुंबई महापालिकेच्या शाळेत लहानग्या रघुनाथचे नाव घातले गेले आणि त्यांचे शिक्षण सुरू झाले.प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर त्यांचे नाव गिरगावातल्याच यूनियन हायस्कूल येथे घातले गेले. पण शाळेची फी खूपच जास्त म्हणजे एकवीस रुपये होती. ती भरता यावी म्हणून त्यांची आई रोज दुप्पट काम करू लागली. माशेलकरांची आई जास्त शिकलेली नव्हती. पण शिक्षणाचे महत्त्व जाणणारी होती. ती माशेलकारांना नेहमी सांगायची, “बाळा इतका शिक इतका शिक की, कोणी तुला तू कमी शिकला आहेस असं कधीच म्हणता कामा नये.”

लहानग्या रघुनाथला आईचे मन आणि तिचे कष्ट दिसत होते. तो अगदी मन लावून अभ्यास करायचा. उत्तम गुण मिळवून पास व्हायचा. पण आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, याचे उत्तर मात्र त्याला सापडत नव्हते आणि मग तो प्रसंग घडला, जो माशेलकरांचे जीवन ध्येय ठरवून गेला. माशेलकर आपल्या यशस्वी जीवनाचे श्रेय त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना देतात. त्यातीलच एक म्हणजे भावे सर!

भावे सर त्यांना विज्ञान शिकवायचे. पण फक्त पुस्तकातले धडे शिकवायचे आणि त्यातली प्रश्नोत्तरे मुलांकडून घोकून पाठ करून घ्यायची अशा पठडीतले ते नव्हते. ते मुलांना विज्ञानातले प्रयोग प्रत्यक्ष करावयास लावत. छोट्या-छोट्या प्रयोगातून विज्ञान समजून देत असत. वेगवेगळ्या कारखान्यांना भेटी देणे, त्यावर चर्चा घडवून आणणे असे उपक्रम ते नेहमी राबवत असत. एके दिवशी त्यांनी वर्गात बहिर्वक्र भिंग आणले आणि ते सर्व मुलांना शाळेच्या मैदानात घेऊन गेले. टळटळीत उन्हाची ती दुपार होती. सरांनी मुलांना कागद गोळा करून आणावयास सांगितले आणि ते बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने जाळून दाखवले. सर्व विद्यार्थ्यांबरोबरच माशेलकरही अगदी चकित झाले. सर म्हणाले, “मुलांनो बघितले, सूर्याच्या प्रकाशाची ताकद एकत्रित केल्यावर कागदसुद्धा पेटवला जाऊ शकतो आणि हे काम बहिर्वक्र भिंग करून दाखवतो.”

प्रयोग संपवून सर्व मुले वर्गाकडे परत निघाली. आज काहीतरी नवीन शिकायला, अनुभवायला मिळाले याचा आनंद सर्वच मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या बरोबर माशेलकरही वर्गात जाण्यासाठी निघाले. तोच भावे सरांची हाक त्यांच्या कानावर पडली. ते सरांकडे परत गेले. जवळ येताच भावे सरांनी माशेलकरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “माशेलकर बहिर्वक्र भिंगाने सूर्याच्या प्रकाश किरणांची शक्ती एकत्रित करून कागद जाळून दाखवला. तशीच तूदेखील तुझी शक्ती एकाच गोष्टीवर केंद्रित कर. तसे केलेस, तर तुझ्या हातून जगाला आश्चर्य वाटेल अशा गोष्टी घडतील!”

हे ऐकून माशेेलकरांच्या डोक्यात प्रकाश पडला. होय, सर म्हणतात तेच खरे! आपणही आपल्या आवडत्या विषयावर म्हणजेच विज्ञान या विषयावर लक्ष केंद्रित करूया, असे त्यांनी ठरवले. मित्रांनो, यानंतर माशेलकर विज्ञानाच्या अभ्यासाने अगदी झपाटून गेले आणि या छोट्याशा प्रसंगातून पुढे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा थोर शास्त्रज्ञ जन्माला आला. पुढे त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयावर संशोधन केले. हळदीची आणि बासमती तांदळाची त्यांनी लढलेली पेटंट लढाई आणि त्यात मिळवलेले यश ही भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची कामगिरी मानले जाते. विशेष म्हणजे ज्या वहीत थोर शास्त्रज्ञ न्यूटनची सही आहे, त्या वहीवर सही करण्याचा बहुमान त्यांना मिळाला! तशी सही करणारे ते केवळ दुसरे भारतीय आणि एकमेव मराठी व्यक्ती होत!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -