Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविकासाचा ‘म्युच्युअल’ मंत्र

विकासाचा ‘म्युच्युअल’ मंत्र

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

आज लाखो लोक एसआयपीमार्गे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. डिसेंबर २०२३ मध्ये भारतातील म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तांचे प्रमाण प्रथमच ५० लाख कोटी रुपयांवर जाणे, ही आनंदाची बाब आहे. महागाईला तोंड देण्यासाठी आपली बचत अधिक फायद्याच्या ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने म्युच्युअल फंड चांगले ठरत असल्याची जाणीव लोकांना होणे ही स्वागतार्ह बाब आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून बंपर कमाई करता येते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना तसेच इतर योजनांपेक्षा अधिक कमाई करता येते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजारावर आधारित असते. त्यामुळे या योजनेत जोखीम अधिक असते. गेल्या काही वर्षांपासून मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. हे फंड मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. योग्य फंडची निवड केल्यास, गुंतवणुकीची वेळोवेळी समीक्षा केल्यास फायदा होऊ शकतो. काही फंडांनी गेल्या तीन वर्षांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बँका, पोस्ट ऑफिसच्या योजनांपेक्षा अधिकची कमाई करून देते. एसआयपी (सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)मध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. भारतात ‘एसआयपी’मध्ये वेगाने गुंतवणूक वाढत आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सात वर्षांपूर्वी मासिक एसआयपी गुंतवणूक तीन हजार कोटी रुपये होती. आता हा आकडा वाढून दर महा १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तज्ज्ञांच्या मते एसआयपीमधून सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. ‘एसआयपी’मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा निधी उभारता येतो.

जगातील कोणत्याही विकसित देशाच्या उभारणीत आणि प्रगतीमध्ये भांडवली बाजाराचा मोठा वाटा असतो. कर्जरूपाने भांडवल उभारण्यापेक्षा भागभांडवल रूपाने उभे करणे अधिक स्वस्त आणि फायद्याचे असते. अर्थात भागभांडवल आणि कर्ज या दोन्ही पद्धतींनी उद्योगपतींना अर्थबळ उभे करावे लागते, हा भाग वेगळा. बहुसंख्य लोकांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे, जोखमीचे वाटते. शेअर बाजार हा एक प्रकारचा जुगार आहे, अशी भावना असते. सर्वसामान्य लोकांना कंपन्यांची माहिती मिळवणे आणि तिचे विश्लेषण करून अंदाज बांधणे हे शक्य कोटीतले वाटत नाही. बर्याचजणांना तेवढा वेळही नसतो.

काहीजण कोणत्या कंपनीचे शेअर्स घ्यावेत आणि कोणते विकावेत याबाबत ओळखीच्या लोकांकडून ‘टिप्स’ घेतात; परंतु या टिप्स विश्वासार्ह नसल्यास चुकीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक अडकून पडते. जास्त भावाला घेतलेला शेअर कोसळल्यास गुंतवणूकदार घाबरून विकण्याच्या मागे लागतो किंवा अविचाराने एखादा शेअर वारेमाप भावाने विकत घेतो आणि नंतर त्याचा भाव न वाढल्यास किंवा घसरल्यास, पश्चाताप करू लागतो. या सर्व भानगडी करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरते. कारण तुमच्या वतीने गुंतवणूक करण्याचा निर्णय तो म्युच्युअल फंड करत असतो. त्या फंडाकडे तज्ज्ञांची फौज असते.

स्वतंत्र फंड व्यवस्थापक असतो. आज लाखो लोक म्युच्युअल फंडात पैसे टाकतात किंवा एसआयपीमध्ये निधी गुंतवतात.
या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२३ मध्ये भारतातील विविध म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या मालमत्तांचे प्रमाण प्रथमच ५० लाख कोटी रुपयांवर जाणे, ही आनंदाची बातमी आहे. यावरून म्युच्युअल फंड उद्योग किती लोकप्रिय होत आहे आणि खासकरून समभाग वा शेअर संलग्न योजनांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात आपली बचत गुंतवत आहेत, असे दिसते. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया’ या संस्थेने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यामध्ये एसआयपी योजनेअंतर्गत १७,६१० रुपये आकर्षित झाले आहेत. डिसेंबर २०२३ मध्येच ४०,३२,६४३ एवढ्या नवीन एसआयपीजची नोंदणी झाली.

भारतातील म्युच्युअल फंडात दहा लाख कोटी रुपये जमा होण्यास पन्नास वर्षे लागली; परंतु ४० लाख कोटी रुपयांवरून ५० लाख कोटी रुपयांपर्यंत निधीची मजल मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये मारली गेली आहे. याचा अर्थ, २०१४ पासून म्युच्युअल फंड उद्योगाचा विकासदर अधिक वेगवान आहे. सध्या देशामध्ये राजकीय स्थैर्य आहे. केंद्रात आणि अनेक राज्यात एकाच पक्षाचे राज्य आहे. त्याचप्रमाणे व्यापार आणि उद्योगाला अनुकूल अशी धोरणे आखली जात आहेत. अर्थात जीएसटी प्रणालीमुळे आंतरराज्य व्यापारही वाढला आणि ही प्रणाली यावी, म्हणून २०१४ च्या अगोदरपासूनच प्रयत्न सुरू होते. देशातील आर्थिक उदारीकरणाची धोरणे मोदी सरकार आल्यापासून कायम आहेत. शिवाय २००८ मध्ये आली तशी जागतिक मंदी त्यानंतर आलेली नाही. नरमाई जरूर आली, परंतु मंदी येणे किंवा बड्या बड्या बँका, विमा कंपन्या, वित्तसेवा देणाऱ्या कंपन्या कोसळणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात झालेले नाहीत.

२०१४ पूर्वी कच्च्या तेलाचे भाव ज्या प्रमाणात वाढले होते, तसे ते त्यानंतर वाढले नाहीत. या अनुकूलतेचाही फायदा २०१४ नंतर झाला, हे नाकारता येणार नाही. आज म्युच्युअल फंडसच्या विश्वात इक्विटी किंवा समभाग संलग्न योजना सगळ्यात लोकप्रिय आहेत. त्यातही विशिष्ट क्षेत्रातील किंवा थिमॅटिक फंड योजना लोकांना जास्त रुचत आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात स्मॉल कॅप फंडामध्ये ३,६९९ कोटी रुपये जमले, तर डिसेंबरमध्ये हा आकडा ३,८५७ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला. लार्ज आणि मिडकॅप फंडांमध्ये डिसेंबरमध्ये अनुक्रमे २,३३८ आणि १,३९३ कोटी रुपये आकर्षित झाले.

नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमधील लार्ज कॅप फंडातील निव्वळ आवक वाढली, तर मिडकॅप फंडातील आवक घटली. एकूण लोक केवळ बँका वा कंपन्यांतील ठेवी, अथवा पोस्टाच्या योजना यावरच भर न देता, जास्त उत्पन्न देणाऱ्या म्युच्युअल फंडांकडे वळत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या डिसेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित असलेल्या चलन फुगवट्याचा दर त्या अगोदरच्या आठ महिन्यांपेक्षा जास्त होता. थोडक्यात, भाववाढीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशा वेळी महागाईला तोंड देण्याचा मार्ग म्हणजे आपण पै-पै साठवून निर्माण करत असलेली बचत अधिक फायद्याच्या ठिकाणी गुंतवणे. शिवाय फायदा बघताना त्यामध्ये कमीत कमी धोका असणे श्रेयस्कर असते. त्या दृष्टीने म्युच्युअल फंड अर्थातच अधिक चांगले ठरतात. लोकांना याची जाणीव होणे ही स्वागतार्ह बाब आहे, असेच म्हणावे लागेल.

‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत; पण एखादी चूक महागात पडू शकते. ‘एसआयपी’चा पहिला फायदा तिथल्या गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता हा आहे. म्हणजेच सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडता येतो. याशिवाय गरज असते तेव्हा गुंतवणूक करता येते आणि ‘एसआयपी’मधून पैसे काढता येतात. उत्पन्न वाढले की पुन्हा गुंतवणूक वाढवता येते. ‘एसआयपी’मध्ये चक्रवाढीचा मोठा फायदा आहे. गुंतवणुकीवर चक्रवाढव्याज मिळते. त्यामुळे एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते ‘एसआयपी’मध्ये दर वर्षी पाच किंवा दहा टक्के दराने थोडी रक्कम गुंतवल्यास दीर्घकाळात मोठा फायदा होतो. ‘एसआयपी’मध्ये रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच बाजार घसरत असेल आणि पैसे गुंतवले असतील तर जास्त युनिट्स मिळतात आणि मार्केट वाढत असेल तर वाटप केलेल्या युनिट्सची संख्या कमी होते. अशा परिस्थितीत बाजारातील चढ-उतारांच्या बाबतीतही खर्च सरासरी राहतो. म्हणजे बाजार घसरला तरी नुकसान होत नाही. बाजार वाढतो तेव्हा सरासरी गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याची संधी मिळते.

एसआयपी सुरू करण्याआधी योग्य माहिती आणि अभ्यास केला पाहिजे. अभ्यास आणि पडताळणी केल्याशिवाय सुरू केलेली गुंतवणूक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. ‘एसआयपी’ सुरू केल्यावर मध्येच थांबवण्याची चूक करू नये. त्यामुळे अपेक्षित नफा मिळणार नाही. जास्त पैसे कमवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवू नये. अनेक वेळा लोक विविध कारणांमुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक चालू ठेवू शकत नाहीत, त्यांना नुकसान सहन करावे लागते. बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांमुळे एसआयपीमध्ये अचानक बदल करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाला चिकटून राहिले, तरच जास्त लाभ मिळेल. सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नये, हा आणखी एक महत्त्वाचा नियम. पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांचा समावेश करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -