Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभीमसूर्याचे आभाळ पेलणारी रमाई...

भीमसूर्याचे आभाळ पेलणारी रमाई…

विजय वाठोरे, नांदेड

रमाई म्हणजे त्यागमूर्ती, कारुण्याची माता अन् बाबासाहेबांची प्रेरणा होय. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या पतीसाठी, आपल्या संसारासाठी वेचले आणि त्यासाठी सदा धडपडीने आणि तळमळीने, आपले तन, मन, धनाने कार्यतत्पर होऊन राबणारी अशी स्त्री होय. रमाई होती म्हणूनच बाबासाहेब घडले. भीमराव दिवा होते तर रमा त्या दिव्याची वात होती आणि ही वात अविरतपणे बाबासाहेबांसाठी तेवत होती. बाबासाहेबांना प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणाला रमाई साथीला होती. रमामुळे बाबासाहेबांना संसारातील अनेक अडचणींना सामोरे जाता आले.

रमा या भिकू वलंगकरांच्या कन्या. रमाला ३ बहिणी व एक भाऊ होता. थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते आणि तिला दापोलीला दिले होते. लहानपaणीच रमाची आई रुक्मिणीचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर याचा खूप मोठा आघात झाला होता. रमाचे वडील भिकू हे बंदरावर माशांनी भरलेल्या टोपल्या नेऊन देत असत. त्यांना छातीचा त्रास होता. तरीही भिकू आपल्या मुलांसाठी दररोज बंदरावर जायचे आणि माशांनी भरलेल्या टोपल्या नेऊन द्यायचे. त्यांना आपल्या मुलांची खूप चिंता होती. अशातच रमाचे वडील भिकू यांचेही निधन झाले. रमा आणि तिची भावंडे पोरकी झाली होती. रमा खूप समंजस अन् कार्यतत्पर होती. तिला सर्व गोष्टींची जाण होती. त्यांचे लहान भाऊ व बहीण अजाण होती. त्यामुळे त्यांची जबाबदारीही आता रमावर आली होती. रमाला जबाबदारी पेलण्याचे बहुधा इथूनच धडे मिळाले.

या पोरक्या मुलांना सावरण्यासाठी रमाचे काका व मामा पुढे सरसावले. रमाला आणि तिच्या भावंडांना घेऊन वलंगकर काका आणि गोविंदपूरकर मामा मुंबईला भायखळ्यात राहायला गेले. तिथे सुभेदारांच्या भीमरावांसोबत रमाचे लग्न झाले. लग्नाच्या वेळेस भीमराव १४ वर्षांचे अन् रमा केवळ ९ वर्षांची होती. लग्न अगदी साधेच झाले. नंतर रमा भीमरावांच्या सावली बनून राहिल्या. भीमराव शिक्षणासाठी लंडनला गेले असताना, रमा आपल्या संसारात दुष्काळाच्या आगीशी लढत होती. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी होती. रमाने मोठ्या धैर्याने, जिद्दीने आलेल्या संकटांवर मात केली.रमाने अनेक मरणे पाहिली. लहानपणी आई- वडिलांचा मृत्यू, नंतर रामजी सुभेदारांचा, त्यापाठोपाठ बाबासाहेबांचे भाऊ आनंदराव अन् आनंदरावांचा मुलगा, बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई व त्यांची स्वतःची मुलगी इंदू व मुलगा बाळ गंगाधर या साऱ्यांचे मृत्यू रमाच्या मनात दुःखाचे डोंगर करून बसले होते. असे असतानाही तिने आपले कार्य प्राणपणाने अन् तत्परतेने पार पाडले.

बाबासाहेबांचे उच्च शिक्षण चालू होते आणि रमा त्यांना कोणत्याही गोष्टीची जाण न होऊ देता संसारात होणारी वाताहत त्या झेलत होत्या. अगदी आपल्या राजरत्न या मुलांच्या मृत्यूचेही बाबासाहेबांना कळविले नाही. संसारात त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्या एकट्या होत्या अन् घर चालविण्यासाठी तिने अक्षरशः शेणाच्या गौऱ्या थापल्या. मुलांना खायला मिळायचे नाही म्हणून रमाने उपास – तपास केले. सवर्णीयांना दिसू नये म्हणून त्या रातीला शेणासाठी वणवण भटकायच्या. शेण जमा करून गौऱ्या थापायच्या अन् जी काही मिळकत आहे ती संसारासाठी अन् बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी जोडून ठेवायच्या. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना त्यांनी आपल्या दुःखाची झळ कधी पोहोचूच दिली नाही.

बाबासाहेब परदेशातून परतून आले तेव्हा मुंबईच्या बंदरावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जनता आली होती. बाबासाहेबांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमले होते. रमालाही साहेबांच्या भेटीची ओढ होती. पण त्यांना नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला भरजरी फेटा लपेटला अन् त्या निघाल्या. पण त्यांनी दुरूनच साहेबांचे दर्शन घेतले. तरीही बाबासाहेबांची नजर रमावर गेलीच. साहेबांनी रमाला विचारलं रमा सर्वजण मला भेटत आहेत आणि तू असं दुरून का बरं. रमाणे मोठ्या उदार मनाने उत्तर दिलं. तुम्हाला भेटण्यासाठी सारी जनता उत्सुक असताना त्यांच्या आधी मी भेटणे हे तर योग्य नाही. मी तर तुमची पत्नी तुम्हाला कधी भेटू शकते. अशा उदार मनाच्या, करुणाशील अन् शांत स्वभावाच्या रमाईंनी बाबासाहेबांना साथ दिली अन् बाबासाहेबांनीही रमाच्या कष्टाचे चीज करत परदेशात त्यांनी ज्ञानदान घेऊन बॅरिस्टर झाले. अठरा अठरा तास अभ्यास करून, प्रसंगी उपाशी राहून त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. आपल्या भारतात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता नांदण्यासाठी संविधान लिहिले. पण या साऱ्याची प्रेरणा होती ती फक्त आणि फक्त रमाईच.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -