Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणवर्षभरात मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न शून्यच!

वर्षभरात मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न शून्यच!

मच्छीमारांचा अखेरचा हंगामही वाया

नांदगाव (प्रतिनिधी) : दर्यात मच्छीच मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचा अखेरचा हंगामही वायाच गेला आहे. गेले वर्षभर मुरूड, राजपुरी, एकदरा, नांदगाव, बोर्ली, कोर्लई, दिघी समुद्र आणि खाडीपट्टीतील मच्छीमार अशीच स्थिती अनुभवत असून मच्छी कधी ना कधी मिळेल या आशेवर वर्षभर मच्छीमारांना केवळ प्रतिक्षाच करावी लागल्याचे भयाण चित्र पुढे आले आहे. येथील पारंपरिक मच्छीमारांना मोठीच काय पण छोटी मासळी मिळण्याची शक्यता हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात देखील मावळल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक मच्छीमारांना १ जून पूर्वीच मासेमारी नौका नाईलाजाने किनाऱ्यावर आणाव्या लागल्याचे दिसून आले आहे.

काही मालकांनी नौकांचे कडू तेल, मीठ यांचे मिश्रणांतून बनलेले ‘चोप्रान’ लावण्यास घेतले असल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. सर्व नौका पूर्णतः किनाऱ्यावर ओढून साकारण्यात आलेल्या नसून किनाऱ्यावरील खाडीत नांगरून ठेवलेल्या दिसून येत आहेत. मुंबईकडे जाळीने मासेमारी करणाऱ्या नौका काही अजून १५ दिवसांचा मासेमारी कालावधी बाकी असल्याने मुंबईच्या समुद्रपट्टीत कार्यरत आहेत. मासळी मिळत नसल्याने काही खलाशी किंवा नाखवा मंडळींनी देखील अलिबाग परिसरात मासेमारीपूरक व्यवसायाकडे जाऊन चाकरी सुरू केल्याची माहिती एकदरा या गावातील मच्छीमारांनी दिली.

समुद्रात मासळीचा पडलेला दुष्काळ पाहता भविष्यात लाखो मच्छीमार कुटुंबांना हा धोक्याचा इशारा तर नाही ना?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांतील खाडीपट्ट्यात तर साधा जवळा, मांदेली, बोंबील, खारवा, वाकट्या, काटेरी छोटी मासळी देखील मिळत नसून शेकडो मच्छीमारांना उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे.

जवळा मासळीचा हंगाम असूनही ही छोटी मासळी देखील गायब असल्याने याचा अनेक अनुभवी मच्छीमारांना देखील धक्का बसला असून, १५ दिवस बाकी असूनही अखेर मासेमारी अंशतः व थांबविण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. मच्छीमार सहकारी संस्थाना देखील मासळी दुष्काळा कडे अखेर हात टेकावे लागल्याचे दिसून येत आहे. सामान्य मच्छीमारांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असून, पुढची वाटचाल कठीण बनल्याचे दिसून येत आहे.

अखेरचे १५ दिवस हाती शिल्लक
१ जून २०२३ नंतर पावसाळ्यात जुलै २३ पर्यंत दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे शासकीय परिपत्रक आले असून, आता अखेरचे १५ दिवस हाती शिल्लक आहेत. सतत वादळी वारे, येणारी वादळे आणि बदलते वातावरण, जेलिफिश मासळीचे आक्रमण यामुळे वर्षभर समुद्रात मासेमारीला ब्रेक मिळाला. बेकायदेशीर पर्सनीन, एलईडी मासेमारीला मात्र मासळी मिळत होती. याउलट पारंपरिक मच्छीमार मासेमारीस जाऊनही रिकाम्या हाताने अनेकवेळा परत येतानाचे चित्र दिसून आले. पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासळी मिळत नसल्याने त्यांचे खूप नुकसान झाले असून, शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत नसल्याने मच्छीमार कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

महागडी मासळी
मच्छीबाजारामध्ये बाहेरून येणारी महागडी मासळी पर्यटक आणि स्थनिक नागरिकांना घेण्याशिवाय मार्ग नसल्याचे रविवारी दिसून आले. कोलंबी सोडे देखील महागले असून किलोचा दर रु.१८००/- इतका झाला आहे, त्यामुळे ताजी मासळी खाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सुक्या मासळीवर भरवसा ठेवून खरेदीसाठी जावे लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -