Tuesday, May 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजश्रावण महिमा

श्रावण महिमा

‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे’

पूनम राणे

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे या निसर्गकवींनी केलेले श्रावण महिन्याचे समर्पक वर्णन, खरं म्हणजे बारा महिन्यांमध्ये चातुर्मासाचे महत्त्व सांगणारा मानकरी महिना म्हणजे ‘श्रावण’. समस्त सृष्टीला आपल्या जादुई स्पर्शानं हिरवी शाल पांघरून साऱ्या आसमंतात चैतन्य निर्माण करणारा. श्रावण येतो तोच उत्सवांची मेजवानी घेऊन, उत्सवाचं वातावरण निर्माण करणारा, शिवाचा महिमा गाणारा, प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा, श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा, बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करून कोळीबांधवांना आपल्या व्यवसायाची सुरुवात करून देणारा, आईची महती सांगून उत्सवांचा संमेलन साजरा करणारा महिना म्हणजे ‘श्रावण’.

विश्वाच्या सार्वभौम शक्तीची निर्मिती, संगोपन आणि लय करणारा महान तपस्वी वैरागी, कलेचा दाता नटेश्वर, अशा शंभूचा महिमा श्रावणी सोमवारी सुरू होतो. त्याची महती सांगणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांवर भाविकांची गर्दी दिसून येते, त्यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

‘आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा’
‘चला गं सयानो, वारुळाला’
‘नागोबाला पुजायाला’

या लोकगीताची आठवण नागपंचमीच्या दिवशी होते. हा महिलांचा अत्यंत आवडता सण. यानिमित्ताने त्या एकत्र येतात. आपल्या मनातील भावना लोकगीतांतून फुगड्या घालून व्यक्त करतात. भारतीय संस्कृती प्राण्यांवर प्रेम करणारी आहे. या महिन्यात शेतीची कामे चालू असतात. शेतीची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नाश नाग करतो आणि शेतकऱ्याचा मित्र बनतो. थोडक्यात दंश करणाऱ्या नागदेवतेची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘खरी मानवता’, हा नागपंचमीचा सण शिकवून जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या सप्तमीला ‘शीतला सप्तमी’ म्हणतात. या दिवशी पोटाची काळजी घेणाऱ्या शेगडीची पूजा गृहदेवता म्हणून केली जाते.

‘सण आयलाय गो नारळी पुनवेेचा’ असे गाणे म्हणत कोळी बांधवांचा उत्साह वाढवणारा सण म्हणजे ‘नारळी पौर्णिमा.’ नैसर्गिक वायू, तेल, सागरसंपत्ती याचा विपुल साठा करून, मानवी गरजा भागविण्याचे माध्यम असणाऱ्या समुद्राचे पूजन या दिवशी करतात. उसळलेल्या समुद्राच्या लाटांना पौर्णिमेला उतार आलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव या दिवशी समुद्र देवतेचे पूजन करून आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात.

नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमादेखील म्हटले जाते. बहीण-भावाच्या नात्याची वीण रेशमी धाग्याने अधिक दृढ करणारा, नात्यातील स्नेह, जिव्हाळा आणि परस्परांमध्ये पावित्र्य, सद् विचार, सद्बुद्धी जागृत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून गोडधोड खायला देते.

विष्णूचा आठवा अवतार माता देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र, शिशुपाल, पुतना, कंस या दुष्ट शक्तींचा नाश करून, पांडवांना मदत करून गीतेच्या रूपात माणुसकीचा संदेश सांगणारा थोर तत्त्ववेत्ता. पांडवांचा सखा, गुरू सांदीपनी यांचा शिष्य, सुदामा या गरीब गवळी मुलाचा मित्र, अशा अनेक उपाधी असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘गोकुळ अष्टमी.’ दहीकाला याचा निर्माता म्हणजे श्रीकृष्ण. इंद्राचे गर्वहरण करण्याकरिता इंद्र उत्सव न करता, गोवर्धन पर्वताचा उत्सव करण्यास सांगणारा गोवर्धनधारी, कुशल नेतृत्वगुण, हेतूयुक्त आणि अर्थसंपन्न बोलणारा प्रभावी वक्ता म्हणून श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो. या दिवशी मथुरा, वृंदावन, द्वारका पुरी या क्षेत्रात भागवत ग्रंथांचे वाचन, कीर्तन, भजन, पालखी व कृष्णलीलांचे खेळ, नृत्य, गायन हे कार्यक्रम केले जातात.

‘आला रे आला गोविंदा आला’ असे म्हणत दहीहंडीचा सण साजरा करतात. ‘एकीचे बळ मिळते फळ’ हा संदेश व संघटन हा सण शिकवतो. थोडक्यात या सणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामाजिक ऐक्य टिकवणे.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी’ या उक्तीप्रमाणे मातृ पूजनाचा हा सण श्रावण अमावास्येला येतो. या अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. या दिवशी कृष्णाने कंसाचा वध करून माता देवकी आणि वासुदेव यांच्या हातापायातील बेड्या तोडून देवकी मातेला घट्ट मिठी मारली, तो हा दिवस.

मातेचा त्याग, समर्पण भाव, समभाव दृष्टी, निरपेक्ष भाव याची जाणीव ठेवून तिला दु:ख होणार नाही याची काळजी घ्यावी. भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय ज्याच्या कष्टावर शेत पिकते, अशा देवतेची पूजा बैलाच्या रूपात श्रावण अमावास्येला करून, त्यांना विश्रांती देऊन, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांची पूजा केली जाते.

त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिवीरांची आठवण आणि भारतीय स्वातंत्र्याचा जन्मोत्सव ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो म्हणूनच या हर्षभरीत, मनभावन श्रावणाकरिता कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात,

‘सृष्टीत सुखाची करीत पेरणी’
‘आनंदाचा धनी श्रावण आला’
‘हासरा नाचरा जरासा लाजरा’
‘सुंदर साजिरा श्रावण आला’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -