- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ
माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव काही कमी होत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन एकावर एक मोफत, असे अनेक सेल उत्तम चालतात. लहान मुलांना फुकट वगैरे काही कळत नाही; परंतु त्यांना आकर्षण असते ते खेळण्यांचे, खाऊचे. याचाही उत्तम फायदा जाहिरातदार करून घेतात.
मलाही आठवतंय लहानपणी एक लॉलीपॉप मिळायचा... वर लॉलीपॉप आणि त्या लॉलीपॉपच्या काडीच्या खालच्या बाजूला प्लास्टिकचे प्राणी, पक्षी असायचे. म्हणजे ते इतके छोटे असायचे की लहान मुलांच्या हातावरसुद्धा दहा-पंधरा मावतील पण त्याचे आकर्षण मला इतके प्रचंड होते की प्रत्येक वेळेस कोण्या नातेवाइकांनी दुकानात नेल्यावर किंवा आई-बाबांनी विचारल्यावर मी त्याच कंपनीच्या लॉलीपॉपची मागणी करायचे. माझ्याकडे रंगीबेरंगी आकर्षक प्लास्टिकचे प्राणी, पक्षी जसे वाढू लागले तसे शेजारून माझ्या घरी खेळायला येणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या नातेवाइकांच्या माझ्या सोबतीच्या माझ्या वयाच्या मुलांनी तेच लॉलीपॉप आपल्या आई-वडिलांना घेऊन द्यायला भाग पाडले. इतकेच काय आहे तर एकदा मी तो माझा पूर्ण संच शाळेत घेऊन गेले होते मग काय शाळेतल्याही माझ्या मित्र-मैत्रिणींनी एक एक करत ते प्लास्टिकचे प्राणी, पक्षी जमवले. आता इतकी मोठी कथा सांगण्यामागचे कारण तुम्हाला सांगते ते म्हणजे काल एक बातमी वाचली -
एक लहान मुलगा खेळत होता. खेळता खेळता त्याला भूक लागली आणि समोरच्या दुकानात जाऊन आईने त्याला एका कुरकुऱ्याचे पाकीट हातात दिले. ते कदाचित त्या मुलानेच मागितले असेल! मुलगा खेळता खेळता खात होता आणि खाता खाता त्याच्या लक्षातच आले नाही की त्याने काय खाल्ले, तर त्या कुरकुरेच्या पुड्यात मुलांना आकर्षक वाटेल असा सुंदर छोटासा प्लास्टिकचा बॉल होता. खेळण्याच्या नादात आपण बॉल तोंडात टाकलाय हे त्या मुलाच्या लक्षातच आले नाही आणि क्षणभरात तो बॉल त्याच्या घशात अडकला. त्याचा श्वास गुदमरू लागला तसा तो खाली पडला. आई धावत त्याच्याकडे गेली. इतर लोकही जमले; परंतु क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्याला तातडीने जेव्हा इस्पितळात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करताना आईला विचारले की नेमके काय झाले. तेव्हा ती म्हणाली की, तो छान खेळत होता आणि त्याला भूक लागली म्हणून मी त्याला कुरकुरे आणून दिले होते. ते तो खात खात खेळत होता. डॉक्टरांनी त्याचे तोंड उघडले आणि घशात त्यांना तो प्लास्टिकचा बॉल अडकलेला दिसला. त्यानंतर आईने टाहो फोडला आणि स्वतःला ती दोष देऊ लागली की मी स्वतः त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलले!
आता प्रश्न हा येतो की, खरंच एखादे छोटेसे प्लास्टिकचे खेळणे असा एखाद्याचा जीव घेऊ शकतो का? खेळणे जितके आकर्षणाचा भाग असते तितकेच ते काही प्रमाणात धोकादायकही असू शकते! आता त्या कुरकुरेच्या पाकिटावर लिहिलेल्या नावावरून आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतील. आतापर्यंत कदाचित त्या कंपनीच्या मालकाला अटक झाली असेल. त्याच्यावर कोणत्या तरी कायद्याखाली गुन्हाही दाखल झाला असेल... त्याला जेल होईल... कदाचित थोडेफार पैसे देऊन त्याला सोडवले जाईल. काहीही होईल; परंतु कुरकुऱ्याच्या सोबतच असा प्लास्टिकचा बॉल टाकणं हे सर्व दृष्टीने चुकीचे आहे. एक निष्पाप जीव गेलेला आहेच!
कधी कधी आपल्या डोळ्यांसमोर एखादी घटना घडत असते. म्हणजे आपण वरच्याच घटनेचा विचार करूया की, तो मुलगा खेळता खेळता खाली पडला आणि त्याचा श्वास विचित्र प्रकारे चालत होता; परंतु आईच्या किंवा आजूबाजूच्या माणसांच्या हे लक्षातच आले नसेल की, असा कोणता तरी बाॅल या खाद्यपदार्थ सोबतच पाकिटाच्या आत ठेवलेला होता आणि तो त्याच्या घशात अडकलेला आहे. त्यांच्या असे मनात जरी आले असते आणि त्यांनी तपासले असते, तर कदाचित त्यांनी तो बॉल निश्चितपणे काढून त्याचा जीव वाचवला असता!
कोणतीही घटना घडल्यावर आपण असे केले असते तर... आपण तसे केले नसते तर... वगैरे विचार आपल्या मनात येतात आणि तसे विचार मनात येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आपण अनेकांना एखादी घटना सांगतो, जसे की मी ही घटना अनेकांना सांगितली, मग ते अनेकांना सांगतील. अशा तऱ्हेने कोणतीही घटना वा दुर्घटना जर आपण इतरांपर्यंत पोहोचवत गेलो, तर त्याचा फायदा निश्चितपणे होतो. म्हणजे आपण नेहमी भिंतीच्या एका बाजूला असतो आणि भिंतीच्या पलीकडचे जग आपल्याला माहीतच नसते, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या भिंतीबाहेरचे जग दिसू लागते. असे काहीही असले तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की, लहान मुलांना एखाद्या गोष्टीकडे केवळ आकर्षित करणे नाही, तर त्याला त्याचे व्यसन लावणे ही गोष्ट जाहिरातदार करत असतात. म्हणजे आपण नेमक्या कोणत्या वयात मुलांना हे शिकवायचे की, जाहिराती अवास्तववादी असतात म्हणून! आणि आपण निव्वळ सांगितल्याने मुले ते ऐकणार का, हाही प्रश्न आहेच की!
शेवटी हेच की अगदी अलीकडे मी माहेरी गेले होते तेव्हा बाबांना कोणीतरी भेट दिलेला एक आकर्षक रंगीबेरंगी चकचकीत वाडगा आमच्याकडे समोरच ठेवलेला होता आणि त्यात चक्क ती लॉलीपॉपवर मला मिळालेले सर्व प्राणी, पक्षी ठेवलेले होते! खरे तर अनेकदा ते माझ्या दृष्टिक्षेपात येत होते. मला बालपणीच्या अनेक आठवणींमध्ये घेऊन जात होते. पण त्या दिवशी मी माहेरी गेल्यावर चक्क तो वाडगा उचलला आणि कचऱ्याच्या बादलीत ते सगळे प्राणी, पक्षी फेकून दिले. आई आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली तर मी इतकेच म्हटले,
“आई, मी या मोफत मिळालेल्या खेळण्यांमध्ये आनंद मिळवला; परंतु खेळणी प्रत्येकाला आनंद देतातच असे नाही, कदाचित...! आईला माझ्या भावना समजल्या असाव्यात, या विचाराने मी तिथून बाहेर पडले! pratibha.saraph@ gmail.com






