- कथा; रमेश तांबे
विजयला फिरण्याचं खूप वेड होतं. शाळेला सुट्टी असली की निघाला विजय फिरायला! पण त्याचं फिरणं होतं डोंगरदऱ्यात, नद्या-ओढ्यांच्या काठी, तर कधी घनदाट झुडपांनी वेढलेल्या जंगलात!
एक दिवस विजय आई-बाबांसोबत आपल्या गावाला गेला होता. सुट्टीत निसर्गात फिरण्याची योजना त्याने आखली होती. पण त्याला गावचे आताचे रूप खूपच वेगळे वाटले. गावातली झाडे कमी झाली होती. मातीचे रस्ते जाऊन सिमेंटचे रस्ते आले होते. गावाभोवतीचे डोंगर झाडाविना बोडके दिसत होते. हे सर्व बघून विजयला खूपच वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर विजय गेला आणि घाटावर बसून तो निरीक्षण करू लागला. नदीला फारच कमी पाणी होतं... म्हणजे दोन-चार डबकी तेवढी भरलेली दिसत होती. समोरच्या काठावर जुनी पुराणी देवळं उभी होती. डबक्यातल्या पाण्यात बायका धुणी-भांडी करत होत्या. दुसऱ्या डबक्यात दोन-चार म्हशी बसल्या होत्या. उत्तरेच्या बाजूला एक स्मशानभूमी होती. तिथं माणसांची भरपूर गर्दी होती. सगळं वातावरण बघून विजय अगदी विचारात पडला. तासाभराने विजय तिथून उठताच त्याला आवाज आला. थांब विजय, “मला माझी कहाणी सांगायची तुला.” आवाज ऐकून विजय चकीत झाला. “अरे मी नदी बोलते विजय, बस जरा.” विजय पुन्हा बसला आणि ऐकू लागला. “विजय बघतोस ना रे माझी दशा. एकेकाळी माझ्या पात्रात किती पाणी असायचं. तेही अगदी स्वच्छ. त्या पाण्यात कितीतरी रंगीत मासे पोहायचे. ते मला हळूच गुदगुल्या करायचे. दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं होती. देवळात येणारे भाविक भक्ती भावाने मला नमस्कार करायचे. माझ्या वाहत्या पाण्याचे दोन थेंब तीर्थ म्हणून तोंडात टाकायचे. तहान लागल्यावर गटागटा पाणी प्यायचे... मग अचानक नदी गप्प झाली!
विजय म्हणाला, “बोल ना नदीमाई, अशी गप्पा का बसलीस! काही नाही रे विजय दुर्दैवाचे फेरे आणि काय! आज माझं गटार झालंय, दोन-चार डबकी तेवढी वाहत आहेत. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय. एके काळी फुलं फुलायची काठावर, त्यावर फुलपाखरं बसायची. पण तो भूतकाळ झाला माझा. आता इथे डासांचं साम्राज्य आहे. आता गावं वाढलीत, लोक वाढलेत, अन् लोकांच्या सवयींबद्दल तर बोलायलाच नको. सगळी घाण माझ्या पात्रात. खरं सांगू मी कचरा टाकायची जागा झाली आहे आता. अंत्यविधी झाला, की सगळी राख माझ्याच पात्रात. काय अवस्था केली आहे तुम्ही माझी!” नदीचं बोलणं ऐकून, तिची अवस्था बघून नदीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून विजय उठला आणि घराकडे निघाला. विजय घरात येताच आजी म्हणाली, “अरे, ती हारांची पिशवी नदीत टाकून ये जरा” विजयने पाहिले प्लास्टिकच्या पिशवीत भरलेले ते हार! असे भले मोठे बोचके नदीत टाकायचे त्याच्या मनाला पटेना. तो म्हणाला, “आजी नदीत असा कचरा टाकणे बरे नाही.” तशी आजी विजयवर ओरडली, “देवाच्या हारांना कचरा म्हणतोस,” असं म्हणत आजीने घर डोक्यावर घेतलं. म्हणाली, “अरे देवाचे हार आहेत ते म्हणून विसर्जित करायचे असतात नदीत. जास्त शहाणा बनून मला शिकवत बसू नकोस.” आता विजय पुढे दुसरा पर्याय नव्हता. त्याने हाराची पिशवी उचलली अन् तो घराच्या बाहेर पडला...!






