Saturday, August 1, 2026

अडगळ

अडगळ

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

दरवर्षीप्रमाणे मित्राच्या घरी होळीला गेलो. आम्ही सर्व कॉलेजचे मित्र एक एक सण ठरवून त्या त्या मित्राच्या घरी जातो, त्यानिमित्ताने भेटणे होते. माझ्या या मित्राच्या सोसायटीत सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण असे, होळीच्या दिवशी त्या इमारतीतील माणसांसाठी खास आयोजित केले जाते. या सोसायटीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्या निमित्ताने त्या इमारतीतील सगळी माणसे त्यांच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाइकांना खास बोलावू शकतात. फक्त आठ दिवस आधी त्या त्या घरमालकाकडून किती पाहुणे येणार एवढे मात्र खात्रीपूर्वक विचारून घेतात. त्यानुसार त्यांना दिवसभराचा नाश्ता, जेवण वगैरे ठरवता येते. आम्हा साधारण दहा जण तरी गेली दहा-पंधरा वर्षे या सोसायटीत जात आहोत. बाकी सण गप्पाटप्पा करत आनंदाने आणि मुख्य म्हणजे खातपित साजरा करतो, हे स्वाभाविकपणे आलेच! तर आता मुद्द्यावर येते. सणाचा उत्साह. सगळी माणसे इथे तिथे रंगलेली, त्याबरोबर त्या परिसरातील गाड्या, झाडे आणि रस्तेसुद्धा रंगीत झालेले होते. सकाळी ८ वाजता म्हणजे नाश्त्यापूर्वी मी मित्राची घराची बेल वाजवली. त्याच्या मुलीने गोड हसून दरवाजा उघडला. हातात रंगाच्या पिशव्या वगैरे घेऊन तो तयारच होता. तोपर्यंत आमचे हळूहळू इतरही मित्र येऊ लागले. मी त्याला विचारले, “काय रे, तुझी ती पिचकारी कुठं गेली?” म्हणजे गेले तीस-चाळीस वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे त्याची ती खास पिचकारी ही आमच्या ओळखीची झालेली होती. अतिशय उत्तम पितळेपासून बनलेली हातभर लांबीची पिचकारी तो होळीच्या दिवशी सोबत बाळगायचा. त्यातून उडणारे तुषार, आजकाल नावीन्यपूर्ण मिळणाऱ्या जेट स्प्रे सारखे दिसायचे, म्हणजे पूर्ण गोलाकार आणि मध्ये रिकामे असे. ती पिचकारी पितळेची असल्यामुळे बऱ्यापैकी जड होती. त्याच्या आजोबांपासून ती चालत आलेली होती. होळीच्या आठ दिवस आधी त्याला तेल-पाणी करून, माझा हा मित्र तांबा-पितळेसाठी मिळणाऱ्या पावडरने मस्त चमकवून ठेवायचा. मी त्याला पिचकारी संबंधित प्रश्न विचारल्यावर त्याची मुलगी म्हणाली, “मावशी, काय हे गेले पंधरा दिवस झाले बाबा अनेक दुकानांमध्ये ती पिचकारी घेऊन जात होते आणि ती दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे आतील भाग (parts) त्यांना कुठं मिळत नाहीत... तते घाटकोपर, दादर, गिरगाव अशा अनेक ठिकाणी सातत्याने भटकत होते. तुम्ही त्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत!”

इतके बोलून ती थांबली नाही, तर पुढे म्हणाली, “बाजारात इतक्या छान छान पिचकाऱ्या मिळतात, तर आणायच्या त्या. द्यायची ही जुनी पिचकारी फेकून!” मी पाहिले की मित्राचा चेहरा हिरमुसलेला होता. खरोखरी आज होळीच्या दिवशी त्याच्या हातात ती पिचकारी नव्हती याचे त्याला जितके दुःख होत होते तितकेच आम्हालाही होत होते.

तर एकंदरीत माणसाला एखाद्या वस्तूविषयी प्रचंड आकर्षण असते आणि ती वस्तू कायमस्वरूपी आपल्या वापरात असावी, जवळ असावी असे त्याला वाटते. आता लेख वाचताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्ष न लागणाऱ्या; परंतु जवळ असाव्या वाटणाऱ्या अनेक वस्तू निश्चितपणे आठवल्या असतीलच! मी देशा-परदेशात कोणत्याही ठिकाणी कामासाठी, फिरण्यासाठी गेले की जाणीवपूर्वक त्या भागातील ‘संग्रहालय’ पाहायला जाते. खूपदा छोट्या मोठ्या गावात हौशी माणसांची छोटी संग्रहालय असतात, ज्यामध्ये त्यांनी आपल्याच घरातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या भांड्याकुंड्यांचा, घरातील हत्यारांचा, देशा-विदेशातून आलेल्या पत्रांचा स्टॅम्प अशा कोणत्या तरी गोष्टींचा संग्रह केलेला असतो आणि मग तो संग्रह जेव्हा सांभाळणे शक्य नसते तेव्हा ते एखाद्या संग्रहालयाला तो देतात. अशा तऱ्हेने छोटी संग्रहालय हळूहळू मोठी होत जातात. संग्रहालय सांभाळणाऱ्या संस्थांचेही मला यानिमित्ताने आभार मानायचे आहेत, की हा दुर्मिळ खजाना ते वर्षानुवर्ष अतिशय उत्तम सांभाळतात, त्याची स्वच्छता करतात, डागडुजी करतात. काही गोष्टी हळूहळू अडगळीच्या वाटायला लागतात; परंतु त्या भंगारात न देता अशा संग्रहालयाकडे जर दिल्या तर निश्चितपणे नवीन पिढीला, जुन्या जमान्यातील अनेक वस्तू कमीत कमी पाहायला तरी मिळू शकतात!

अलीकडेच एक माणूस भेटला. तो बोलता बोलता सहज म्हणाला, घरातल्या अडगळीच्या वस्तू किती सहज आपण भंगारात देऊ शकतो नाही, पण घरात अडगळ झालेल्या माणसांचं काय?

आपल्याच घरातील माणसांना आपण अडगळ वाटू नये, यासाठी आपण नेमकं काय केले पाहिजे, असा विचार प्रत्येक माणसाच्या मनात डोकावत असेल नाही? मला तर वाटते की, काही वर्षांत यापुढे जिवंत माणसांची संग्रहालय असतील... वृद्ध, अपंग, आजारी आणि घरातल्यांना नकोशी झालेली माणसे तिथे असतील. जिथे माहिती देणारा गाईड सांगेल की ‘हा माणूस पन्नास वर्षांचा असतानाच घरातल्यांना अडगळ झाला होता, कारण तो खूप बोलायचा’, ‘हा माणूस वयाच्या साठाव्या वर्षी घरातल्यांना अडगळ झाला होता कारण खूप खोकायचा’, ‘हा आजार झाला की माणूस असा दिसतो पाहा’, ‘वृद्ध झाल्यावर या माणसांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारच्या सुरकुत्या येतात’ वगैरे. इथे राहणाऱ्या माणसांना, आपल्या जवळ वर्षानुवर्ष प्रेमाने बाळगलेल्या वस्तूंपेक्षा, जवळच्या माणसांच्या नात्याला कोणीतरी तेल-पाणी घालावं, असे वाटत राहील. पण जसे पिचकारीच्या दुरुस्तीसाठीचे भाग आता बाजारात उपलब्ध नाहीत तसेच नवीन पिढीकडे अडगळीत टाकलेल्या माणसांसाठीच्या कोणत्याच भावना शिल्लक असणार नाहीत.

एखाद्या माणसाला अडगळ ठरवताना, कधीतरी ही वेळ आपल्यावर येऊ शकते, एवढा विचार मात्र प्रत्येकाने करून ठेवावा, एवढीच या लेखाकडून अपेक्षा आहे. pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा