Thursday, July 23, 2026

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार

मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाला गती देण्यासाठी चिपी विमानतळाचा विस्तार व सबलीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या दृष्टीने येत्या १५ ऑगस्टपासून चिपी ते नवी मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अशावेळी केवळ रस्ते वाहतुकीवर अवलंबून न राहता चिपी विमानतळावर उतरणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी हे विमानतळ आता जलमार्गांनी जोडले जाणार आहे," अशी घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी केली.(Nitesh Rane)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चिपी विमानतळाच्या आधुनिकतेसाठी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी आखलेल्या सर्वसमावेशक योजनेची सविस्तर माहिती दिली. नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात हक्काचे विमानतळ असावे, हे स्वप्न आदरणीय नारायण राणे साहेब यांनी पहिल्यांदा पाहिले आणि ते सत्यात उतरवले. ते राज्याचे उद्योगमंत्री असताना एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी विमानतळाची उभारणी झाली. मात्र, त्यानंतरच्या काळात येथे उड्डाणे अनियमित राहिली आणि अनेकदा सेवा खंडित झाली. पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वतः या सर्व त्रुटींचा अभ्यास केला की, मोठ्या विमान कंपन्या येथे का येत नाहीत?

चिपी येथे रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची (Night landing) सुविधा उपलब्ध नव्हती. आम्ही केंद्र सरकारकडून या नाईट लँडिंगची रीतसर परवानगी मिळवून दिली आहे. तसेच, वीज पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महावितरणच्या (MSEB) माध्यमातून सुमारे २.५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून विजेच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यात आल्या आहेत. यामुळे आता मोठ्या विमान कंपन्यांच्या उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे राणे यांनी सांगितले.

फ्लाय- १९ आणि इंडिगोची मान्यता

फ्लाय- १९ आणि इंडिगो या दोन्ही प्रमुख कंपन्यांनी चिपी विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची आणि माहितीची पूर्तता करण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी डीजीसीएकडून अंतिम परवानगी मिळेल आणि १५ ऑगस्टचे टार्गेट ठेवून नवी मुंबई ते चिपी अशी विमानसेवा लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

पावणे दोन तासांचा प्रवास १४ मिनिटांत!

पर्यटकांच्या प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी बंदरे खात्याच्या माध्यमातून आखलेल्या योजनेवर बोलताना मंत्री राणे म्हणाले, "चिपी विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर एक जेटी आहे. सध्या चिपीवरून मालवण शहरात पोहोचण्यासाठी रस्तेमार्गाने सुमारे १ तास ५० मिनिटांचा कालावधी लागतो. आम्ही या जेटीचा पूर्ण विकास करत असून, खासगी बोट चालकांशी चर्चा सुरू आहे. लवकरच विमानतळावरून मालवण, वेळापूर, देवगड आणि विजयदुर्ग बंदरांसाठी जलदगती बोट सेवा सुरू केली जाईल. त्यामुळे पर्यटकांना मालवण शहरात जाण्यासाठी लागणारा पावणेदोन तासांचा वेळ १४ मिनिटांवर येईल."

स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पाठबळ देणार

विमानतळावरून पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले. "गोवा किंवा कर्नाटकातील गाड्यांनी इथे येऊन आमचा हक्काचा रोजगार हिरावून घेऊ नये, यासाठी सिंधुदुर्गातील तरुणांनी स्वतःच्या टुरिस्ट गाड्या खरेदी करून व्यवसायात उतरावे. तरुणांना लागणारे आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मी स्वतः उपलब्ध करून देईन. स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देणे आणि पर्यटकांची सोय करणे या दोन्ही गोष्टींना आमचे प्राधान्य आहे," असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >