Wednesday, June 17, 2026

Cricket : टीम इंडिया 'ए' ची फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा

Cricket : टीम इंडिया 'ए' ची फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा

दांबुला : प्रियांश आर्या, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर आणि निशांत सिंधूच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारत 'अ' संघाने त्रिकोणी मालिकेत अफगाणिस्तान 'अ' संघाचा १०१ धावांनी मोठा पराभव केला आहे. या दणदणीत विजयासह भारताने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यापूर्वी दोन पराभवांमुळे दबावात असलेल्या भारतीय संघाने योग्य वेळी फॉर्ममध्ये येत दिमाखात फायनलचे तिकीट पक्के केले.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (२८ चेंडूंत ३८ धावा) आणि प्रियांश आर्या यांनी ७५ धावांची धडाकेबाज भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांश आर्याने अवघ्या ३२ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकारासह ५८ धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड (३० धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर, कर्णधार तिलक वर्मा (७५ चेंडूंत ५९ धावा) आणि विकेटकीपर कुमार कुशाग्र (६७ चेंडूंत ५८ धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शेवटच्या षटकांमध्ये निशांत सिंधू (२१*) आणि विप्रज निगम (२० चेंडूंत ३० धावा) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानकडून फरीदुन दाऊदझाई, अब्दुल्ला अहमदझाई आणि फरमानुल्लाह सफी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

३२० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे ३ फलंदाज अवघ्या ७० धावांवर बाद झाले. यानंतर फैसल शिनोझादा (४६ धावा) आणि बहीर शाह (५२ चेंडूंत ५७ धावा) यांनी ८७ धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानचा लढा कायम ठेवला. परंतु, ही जोडी फुटताच भारताच्या निशांत सिंधूने आपल्या फिरकीची जादू दाखवत अफगाणिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. सिंधूने ३१ धावांत ४ महत्त्वाचे बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज यश ठाकूरने ४८ धावांत २ गडी बाद केले. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा संघ ३६.५ षटकांत २१८ धावांवर सर्वबाद झाला. अंशुल कंबोज, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम आणि अनुकूल रॉय यांनीही प्रत्येकी १ बळी घेतला.

निशांत सिंधू 'प्लेअर ऑफ द मॅच'

फलंदाजीत नाबाद २१ धावा आणि गोलंदाजीत ४ बळी घेणाऱ्या निशांत सिंधूला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' (सामन्याचा मानकरी) पुरस्काराने गौरविण्यात आले. आता या मालिकेतील दुसरा अंतिम फाईट देणारा संघ कोणता असेल, हे शुक्रवारी (१९ जून) होणाऱ्या श्रीलंका 'अ' विरुद्ध अफगाणिस्तान 'अ' यांच्यातील सामन्यावरून स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >