Tuesday, June 9, 2026

Devendra Fadnavis : गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग

Devendra Fadnavis : गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग

- मुख्यमंत्र्यांची मंजुरी; भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालाही मान्यता

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधांचा 'मेगाप्लॅन' मंजूर केला आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यानचा भुयारी मार्ग, फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रोच्या मार्ग विस्ताराच्या एकूण २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी 'मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती'च्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई-ठाणे परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंजूर प्रस्तावानुसार, घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग (टनेल) तयार केला जाईल. तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत (एलिव्हेटेड) पूल उभारण्यात येणार आहे. या एकूण १७ हजार ३६ कोटींच्या प्रकल्पामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पनवेल येथून येणारी वाहतूक थेट राष्ट्रीय महामार्ग-४८ ला जोडली जाईल. हा भुयारी मार्ग अत्याधुनिक 'टीबीएम' (टनेल बोरिंग मशीन) तंत्रज्ञानाचा वापर करून १४ मीटर व्यासाचा बांधला जाणार असून, पुढील पाच वर्षांत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलामुळे वाहनांना ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणे शक्य होणार आहे.

घोडबंदर मार्गावरील जड वाहनांची कोंडी फोडण्यासाठी आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (बीओटी) मॉडेलनुसार केली जाईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' उपलब्ध करून दिले जाईल. तसेच या प्रकल्प परिसरासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नियुक्त करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

नवी मुंबई मेट्रो विमानतळाला जोडणार

या बैठकीत सिडकोच्या ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या नवी मुंबई मेट्रोच्या दोन महत्त्वपूर्ण मार्ग विस्तारांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 'मेट्रो मार्ग १ए' (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि 'मेट्रो मार्ग २' (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-४) यांचा समावेश आहे. या नव्या मंजुरीमुळे सागर संगम ते थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत तब्बल २८ किलोमीटरचा सलग मेट्रो प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. या विस्तारित मार्गांवर एकूण १३ नवीन स्थानके बांधली जाणार असून, भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना या वेगवान सेवेचा फायदा होईल.

Comments
Add Comment