Tuesday, August 11, 2026

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील काही भागांत पावसाची तीव्रता कमी झाली असून, पुढील ७२ तास काही ठिकाणी उष्णता आणि दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. (Maharashtra Weather Update)

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती; १३ ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता

मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते हळूहळू राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Cyclonic Circulation) निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीमुळे १३ ऑगस्टच्या आसपास नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील पावसाचा विचार करता, मराठवाडा वगळता बहुतांश महाराष्ट्रातील पावसाची तूट भरून निघाल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबईत पाऊस असूनही उकाडा कायम :

मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. काही भागांत पाऊस थांबून-थांबून पडत असून, पहाटेपासून काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला. मात्र पावसानंतर दुपारच्या सुमारास पुन्हा ऊन पडत असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात दमटपणा आणि उष्णता जाणवत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसासोबतच उकाड्याचाही सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत तापमानातील चढ-उतार आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

मान्सूनचे वारे कमजोर; तीन दिवस पावसाची ये-जा :

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहावर सागरी हवामानातील बदलांचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. तायवान आणि चीनच्या किनारपट्टीवरून गेलेल्या ‘डॉल्फिन’ वादळाच्या प्रभावामुळे मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल झाला होता. समुद्रातील परिस्थिती हळूहळू सुधारत असली, तरी पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कमी-जास्त होत राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस कायम राहील, तर मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा अलर्ट :

आज पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, राज्याच्या उर्वरित भागांत १४ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर तुलनेने कमी राहू शकतो. त्यानंतर मात्र पुन्हा मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

विदर्भात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता :

पावसाचा जोर कमी झाल्याने विदर्भातील काही भागांत उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढीसोबतच काही ठिकाणी दमट वातावरणही जाणवू शकते. हवामानातील हा बदल लक्षात घेता नागरिकांनी तापमान, पाऊस आणि स्थानिक हवामानाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. (Maharashtra Weather Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा