Friday, May 8, 2026

Rat poison found in watermelon : पायधुनी कलिंगड मृत्यू प्रकरण : उंदीर मारणाऱ्या 'झिंक फॉस्फाईड'वर जगात कोणताही उतारा का नाही? वाचा सविस्तर

Rat poison found in watermelon : पायधुनी कलिंगड मृत्यू प्रकरण : उंदीर मारणाऱ्या 'झिंक फॉस्फाईड'वर जगात कोणताही उतारा का नाही? वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईतील पायधुनी (Mumbai Paydhuni) परिसरात २६ एप्रिलच्या पहाटे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या मृत्यूचे खापर कलिंगडावर फोडण्यात आले होते, मात्र या प्रकरणाचे सत्य अधिक गुंतागुंतीचे आणि भयानक आहे. २५ एप्रिलच्या रात्री १०:३० च्या सुमारास या कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांसोबत बिर्याणी खाल्ली होती. धक्कादायक बाब म्हणजे बिर्याणी खाल्लेला एकही नातेवाईक आजारी पडला नाही. रात्री १ वाजता फक्त या चार जणांनीच कलिंगड खाल्ले आणि त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला. या एका घटनेने पोलिसांचा संशय अन्नावरून हटवून एका भयानक कटाकडे किंवा चुकीकडे वळवला. ७ मे रोजी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी यावर शिक्कामोर्तब केले की, मृतांच्या अंतर्गत अवयवांमध्ये (Viscera) 'झिंक फॉस्फाईड' (ZINC PHOSPHIDE) या अत्यंत विषारी उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश सापडले आहेत. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि आयेशा व झैनब या दोन मुली अशी मृतांची नावे आहेत. कलिंगडामुळे हा मृत्यू झालेला नाही, हे आता स्पष्ट झाले असून हे विष अन्नात मुद्दाम मिसळले गेले, चुकून पडले की पुरवठा साखळीतच फळामध्ये आले, याचा तपास पोलीस करत आहेत.

'झिंक फॉस्फाईड' म्हणजे काय आणि ते इतके प्राणघातक का ठरते?

झिंक फॉस्फाईड (Zn3P2) हे भारतात उंदीर मारण्यासाठी सर्रास वापरले जाणारे एक रसायन आहे. डब्यात किंवा पुडीत पावडर स्वरूपात असताना हे रसायन शांत (Stable) असते. पण, खरा धोका तेव्हा सुरू होतो जेव्हा ते मानवी पोटात जाते. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. जेव्हा झिंक फॉस्फाईड या ॲसिडच्या संपर्कात येते, तेव्हा एक तीव्र रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून 'फॉस्फीन' (Phosphine) नावाचा एक रंगहीन आणि अदृश्य वायू तयार होतो. हा वायू थोड्याशा प्रमाणातही अत्यंत विषारी असतो. कलिंगडाने काय केले? पोटात आधीच अन्न असल्यास किंवा कलिंगडासारखे फळ खाल्ल्यास पोटातील ॲसिडचे प्रमाण अधिक वेगाने वाढते. यामुळे फॉस्फीन वायू अधिक वेगाने तयार होतो. उपाशीपोटी या विषाची लक्षणे दिसायला १२ तास लागू शकतात, पण पोटभर जेवणानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विष आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करते.

फॉस्फीन वायू माणसाचा जीव नेमका कसा घेतो?

हा वायू केवळ रक्तात विष पसरवत नाही, तर तो मानवी शरीराच्या सर्वात मूलभूत घटकावर म्हणजेच 'पेशींवर' (Cells) हल्ला करतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये 'मायटोकॉन्ड्रिया' (Mitochondria) नावाचा घटक असतो, ज्याला पेशींचे पॉवरहाऊस म्हटले जाते. ऑक्सिजनचा वापर करून पेशींना जिवंत ठेवण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याचे काम मायटोकॉन्ड्रिया करतात. फॉस्फीन वायू या मायटोकॉन्ड्रियामधील 'सायटोक्रोम सी ऑक्सिडेज' (Cytochrome C Oxidase) नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या एन्झाइमला ब्लॉक करतो थांबवतो. एकदा का हे एन्झाइम ब्लॉक झाले की, तुमची फुफ्फुसे १००% काम करत असली किंवा तुम्हाला व्हेंटिलेटरवर ठेवून शुद्ध ऑक्सिजन दिला जात असला, तरी तुमच्या पेशी त्या ऑक्सिजनचा वापरच करू शकत नाहीत. यामुळे शरीराच्या पेशी आतून गुदमरून मरू लागतात. याला वैद्यकीय भाषेत 'सेल्युलर ॲनोक्सिया' (Cellular Anoxia) म्हणतात. म्हणूनच झिंक फॉस्फाईडची विषबाधा झाल्यास मृत्यूचा दर ३७ ते १०० टक्क्यांपर्यंत असतो.

या विषावर कोणताही उतारा (Antidote) उपलब्ध आहे का?

नाही. संपूर्ण जगात झिंक फॉस्फाईडच्या विषबाधेवर कोणताही थेट उतारा (Antidote) उपलब्ध नाही. याचे परिणाम उलटे करणारी कोणतीही जादूची गोळी किंवा इंजेक्शन डॉक्टरांकडे नसते. डॉक्टर फक्त इतकेच करू शकतात की, पोटात तयार होणाऱ्या फॉस्फीन वायूचा वेग कमी करणे आणि अवयवांना निकामी होण्यापासून वाचवणे. अशा रुग्णांवर उपचार करताना 'कोकोनट ऑइल स्टमक वॉश' अत्यंत महत्त्वाचा ठरतो. झिंक फॉस्फाईड तेलात विरघळत नाही. त्यामुळे नारळाचे तेल विषाच्या कणांवर एक आवरण तयार करते आणि पोटातील ॲसिडशी त्याचा संपर्क तोडून वायू तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जर या विषबाधेत पोट स्वच्छ करण्यासाठी 'पाण्याचा' वापर केला, तर विषाची ॲसिडसोबतची प्रक्रिया थांबण्याऐवजी अधिक वेगाने वाढते आणि मृत्यू ओढवतो. पोटातील ॲसिडिटी कमी करण्यासाठी 'सोडियम बायकार्बोनेट' (बेकिंग सोडा) दिला जातो. तसेच, विषबाधेत पहिल्या २४ तासांत हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे हृदयाचे रक्षण करण्यासाठी 'मॅग्नेशियम सल्फेट' दिले जाते.

इतर उंदीर मारणाऱ्या औषधांपेक्षा हे वेगळे कसे आणि त्याची ओळख कशी पटते?

सध्या बाजारात मिळणारी बहुतांश उंदीर मारण्याची औषधे ही रक्त गोठू न देणारी (Anticoagulants) असतात. त्यात 'ब्रोमाडिओलोन'सारखी रसायने असतात, जी उंदराला मारण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे घेतात आणि त्यावर 'व्हिटॅमिन के१' (Vitamin K1) हा उतारा उपलब्ध आहे. पण झिंक फॉस्फाईडला कोणताही उतारा नाही आणि ते काही तासांतच जीव घेते.

तज्ज्ञ हे विष कसे ओळखतात?

या विषबाधेतील रुग्णाच्या श्वासाला लसूण किंवा कुजलेल्या माशांसारखा तीव्र उग्र दर्प येतो, जी डॉक्टरांसाठी धोक्याची पहिली घंटा असते. तसेच, झिंक हा एक जड धातू (Heavy Metal) असल्याने, रुग्ण बेशुद्ध असला तरी त्याच्या पोटाच्या एक्स-रे (X-ray) मध्ये हे विष चमकदार ठिपक्यांसारखे स्पष्ट दिसून येते. पायधुनीतील ही घटना आपल्याला एक गंभीर इशारा देते की, भारतातील सर्वात धोकादायक आणि जीवघेणे रसायन कोणत्या संरक्षित फार्मसीमध्ये नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील एखाद्या डब्यात उंदीर मारण्याचे औषध म्हणून पडून असू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा