Thursday, May 7, 2026

Mumbai paydhuni four death watermelon : कलिंगड नव्हे, तर 'या' कारणामुळे गेला डोकाडिया कुटुंबाचा जीव; मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

Mumbai paydhuni four death watermelon : कलिंगड नव्हे, तर 'या' कारणामुळे गेला डोकाडिया कुटुंबाचा जीव; मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

मुंबई : मुंबईतील पायधुनी(Mumbai Paydhuni Watermelon Case) परिसरात डोकाडिया कुटुंबावर (Dikadia Family)ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण शहर हादरून गेले होते. रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे कलिंगड खाण्याविषयी नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती, ज्याचा नाहक फटका कलिंगड उत्पादक शेतकरी आणि फळ विक्रेत्यांना बसला. मात्र, आता या प्रकरणाचे खरे कारण समोर आले आहे. कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (Forensic Science Laboratories) (एफएसएल) अहवालानुसार, या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झिंक फॉस्फाईड (Zinc phosphide) झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. कलिंगड आणि मृतांच्या शरीरात या विषाचे अंश आढळून आल्याने तब्बल ११ दिवसांनी पोलीस आणि तपास यंत्रणांना या गुंतागुंतीच्या मृत्यूचे गूढ सोडवण्यात मोठे यश आले आहे.

तपास अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने आणि एफएसएलचे प्रयत्न

या प्रकरणाचा तपास करणे कलिना एफएसएलसाठी सोपे नव्हते. डॉ. विजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या पथकाने रात्रंदिवस एक करून या प्रकरणाचा अभ्यास केला. विषबाधेतून मृत्यूपूर्वी या चौघांनाही मोठ्या प्रमाणावर उलट्या झाल्या होत्या. विष बहुतांश प्रमाणात उलट्यांवाटे शरीराबाहेर पडल्याने त्यांच्या शरीरातून विषाचे नमुने मिळवणे अत्यंत कठीण झाले होते. तरीही, अत्यंत सूक्ष्म तपासणी आणि अथक परिश्रमांनंतर एफएसएल पथकाला यश आले. मृतांच्या शरीरात आणि घरातील कलिंगडावर 'झिंक फॉस्फाईड' या उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश स्पष्टपणे सापडले. याव्यतिरिक्त, जे. जे. मार्ग पोलिसांनी घरातून पुलाव, खजूर आणि पाण्याचे नमुनेही तपासासाठी जप्त केले होते. आता या फॉरेन्सिक अहवालाचा सखोल अभ्यास करून आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

२६ एप्रिलची ती काळरात्र: नेमकं काय घडलं होतं?

२६ एप्रिलचा दिवस डोकाडिया कुटुंबासाठी शेवटचा ठरला. या दिवशी अवघ्या काही तासांच्या अंतराने कुटुंबातील चार सदस्यांनी प्राण गमावले. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (वय ४४), त्यांची पत्नी नसरीन (वय ३५), आणि त्यांच्या दोन तरुण मुली आयेशा (वय १६) व झैनब (वय १३) यांचा समावेश होता. रात्री सर्वांनी कलिंगड खाल्ले होते आणि त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. एकाच कुटुंबाचा असा अचानक आणि संशयास्पद अंत झाल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती आणि या मृत्यूचे खापर सुरुवातीला कलिंगडावर फोडले गेले होते.

'झिंक फॉस्फाईड' म्हणजे काय आणि ते किती धोकादायक आहे?

झिंक फॉस्फाईड हे प्रामुख्याने उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत विषारी आणि प्राणघातक रसायन असून, ते मानवी शरीरात गेल्यास त्याचे भयंकर परिणाम पाहायला मिळतात. हे रसायन पोटात गेल्यावर तेथील आम्लासोबत (Acid) त्याची प्रक्रिया होते व त्यातून 'फॉस्फीन' नावाचा अतिशय घातक वायू तयार होतो. या विषारी वायूमुळे शरीरात विषबाधा होऊन सुरुवातीला तीव्र मळमळ, उलट्या होणे, पोटात असह्य वेदना होणे आणि चक्कर येणे अशी प्राथमिक लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. विषबाधेचा प्रभाव जसजसा वाढत जातो, तसतसे व्यक्तीला अत्यंत अशक्तपणा जाणवू लागतो, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, अंगाला घाम फुटतो, अस्वस्थता वाढते आणि रक्तदाब (BP) वेगाने कमी होऊ लागतो. या विषबाधेच्या अंतिम टप्प्यात विषाचा थेट परिणाम हृदय, यकृत (Liver) आणि मूत्रपिंडांवर (Kidneys) होतो, ज्यामुळे हे महत्त्वाचे अवयव निकामी होतात. परिणामी, व्यक्ती थेट बेशुद्ध पडते आणि यामध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता सर्वाधिक असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा