Saturday, May 2, 2026

ग्रिप्समधल्या उत्क्रांतीवादाचे माकडचाळे

ग्रिप्समधल्या उत्क्रांतीवादाचे माकडचाळे

पाचवा वेद : भालचंद्र कुबल

परीक्षा संपल्यात, सुट्ट्या सुरू झाल्यात आणि बालनाट्याचा सीझन सुरू झालाय. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी हे दोन कालावधी सोडले तर बालनाट्ये परदेशांप्रमाणे १२ महिने बघायला मिळत नाहीत. अलबत्या गलबत्या किंवा आज्जीबाई जोरात सारखा एखाद-दुसरा अपवादच मराठी रंगभूमीवर पाहायला मिळतो. इतर भाषिक बालनाट्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. खरंतर 'हॅरी पॉटर'ने जगभरात बालनाट्याचा वेगळाच ट्रेंड सेट केला. मोठ्यानी छोट्यांसाठी केलेले नाटक ही ग्रिस्पं? थिएटरची संकल्पना चित्रपट माध्यमात वापरली गेली आणि ती कमालीची यशस्वी देखील झाली. पुढे अनेक देशातील कित्येक भाषांनी हा ट्रेंड फॉलो केला. या ग्रिस्प थिएटरबद्दल आज लिहिणार आहे कारण बरोबर एका वर्षानी या विषयाला हात घालण्याची आयती संधी सध्या रंगमंचावर गाजत असलेल्या ‘माकडचाळे’ या नाटकाने मिळवून दिली.

ग्रिप्स थिएटरचा उगम १९६० च्या दशकात बर्लिनमध्ये झाला. १९६६मध्ये या बाल-तरुण रंगभूमीची स्थापना झाली, असे उल्लेख आढळतात. भारतात, विशेषतः पुण्यात, मोहन आगाशे यांनी १९८५-८६ च्या सुमारास हा प्रकार आणला. ग्रीप्स थिएटर हा जर्मनीतून सुरू झालेला, मुलं आणि तरुणांसाठीचा सामाजिक आशयाचा नाट्यप्रकार आहे. यात परीकथा किंवा फक्त करमणूक यापेक्षा मुलांच्या जगण्यातले प्रश्न, अडचणी, हक्क, शाळा, कुटुंब, सामाजिक वास्तव असे विषय रंगमंचावर येतात. थोडक्यात, ग्रिप्स थिएटर म्हणजे मुलांसाठीचे जागरूकतापूर्ण, समाजाभिमुख, वास्तववादी नाट्य...!

भारतामध्ये ग्रिप्स थिएटरशी संबंधित सर्वात प्रसिद्ध नाटकांमध्ये “पण आम्हाला खेळायचंय” हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे ग्रिप्सच्या विचारसरणीवर आधारित आणि पूर्णतः भारतीय पातळीवर तयार झालेलं पहिलं नाटक म्हणून उल्लेखले जाते. ‘छान छोटे वाईट मोठे’, ‘नको रे बाबा’, ‘प्रोजेक्ट अदिती’, ‘एकदा काय झालं’ आणि आता ‘माकडचाळे’...! हे दखल घेण्याजोगे चौकट मोडणारे बालनाट्य आहे. माकडातील माणुसकी, उत्क्रांती, जंगलातील संघर्ष, मराठी भाषा, मैदानी खेळ आदी मुलांच्या सर्व अवस्थांना (शिशू, बाल, किशोर, युवा)आकर्षित करणारा हा फॉर्म्युला बालनाट्याच्या तमाम प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

मोहन आगाशे यांनी भारतात, विशेषतः पुण्यात, ग्रिप्स थिएटरची सुरुवात आणि प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी १९८० च्या दशकात हा बाल-तरुणांसाठीचा सामाजिक नाट्यप्रकार रुजवला आणि तो विचार करायला लावणारा, विनोदातूनही आशय देणारा प्रकार म्हणून पुढे नेला. मोहन आगाशे यांच्या मते, ग्रिप्स नाटक हे ‘रुचकर अन्ना’सारखं आहे - चविष्टही आणि आरोग्याला पोषकही; म्हणजेच ते विचार निर्माण करतं पण उपदेशासारखं वाटत नाही.

ग्रिप्स थिएटरमुळे मुलांच्या विचारशक्तीवर, संवेदनशीलतेवर आणि प्रश्न विचारण्याच्या सवयीवर चांगला परिणाम झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. या नाटकांनी मुलांच्या आजूबाजूच्या जगातील प्रश्न, भीती, शाळा, कुटुंब आणि सामाजिक ताण हलक्या व अर्थपूर्ण रीतीने समजावले. माकडचाळे हे या थिअरीचे आदर्श उदाहरण आहे. मोबाईलमधे कायम डोके खुपसून बसणारी तीन मंत्र्यांची मुलं जंगल सफारी सहलीत हरवतात. अचानक वाघाचा हल्ला होतो व त्या क्षणी एक माकड तो हल्ला परतवून लावतं. पुढे ती मुलं जंगलात राहून निसर्गाचं खरं रुप आणि माकडापासून मानवा पर्यंतची उत्क्रांती शिकतात. कधी इमोशनल तर कधी कन्फ्लिक्ट तर कधी स्ट्रगल करायला लावणारा हा स्टोरी प्लॉट इंग्लिश मिडीयमच्या मुलांनाही आकर्षित करणारा आहे.

अवनी-श्रद्धा शितोळे, माँटी - ओमकार तेली, चिंटू - रुपेश जगताप, मुख्यमंत्री - रितेश बायस, शिक्षण मंत्री - राकेश शिर्के, पर्यावरण मंत्री - श्रुती हळदणकर, पी. ए - रिया साटम, टोळी सदस्य - प्रज्योत देवळे आणि दिग्दर्शक तथा माकडाच्या भूमिकेत प्रशांत निगडे नाटकात धमाल उडवून देतात. तसेच सुप्रिया बर्वे यांची वेशभूषा आणि रोहन पाटील यांच्या संगीताचा विशेष उल्लेख करायला हवा.

माकडापासून मानव निर्माण होण्याच्या उत्क्रांतीवादाचे हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण देण्याचा हा ग्रिप्स नाट्यप्रकार जरूर पहावा असाच आहे.

(छायाचित्र सौजन्य : संजय पेठे)

Comments
Add Comment