Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नानीवली परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दोन मित्रांचा भीषण अंत झाला आहे. आपल्या १५ वर्षीय मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आणि मित्राला गमावल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्यानेही काही मिनिटांतच टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
भरधाव वेग आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव लहांगे (१५) आणि नितीन वर्था हे दोघे जिवलग मित्र होते. ते दोघेही शनिवारी पहाटे एका लग्नकार्यावरून दुचाकीने घरी परतत होते. पहाटेची वेळ असल्याने रस्ता मोकळा होता. मात्र नानीवली परिसरात त्यांच्या दुचाकीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. भरधाव वेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सौर ऊर्जेच्या खांबाला जाऊन धडकली. (Palghar Road Accident)
मित्राचा विरह असह्य , उचललं टोकाचं पाऊल
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी कित्येक फूट हवेत उडाली. त्यानंतर ती जवळच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात वैभव लहांगेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातून बचावलेल्या नितीनला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने त्याचा मित्र वैभवबद्दल विचारणा केली. यावेळी त्याला वैभव आता या जगात नाही असे समजले आणि त्याला मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर समोर आपल्या मित्राचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचून गेला.(Palghar Road Accident)
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, नितीनला त्याच्या मित्राचा विरह असह्य झाला आणि याच प्रचंड मानसिक तणावातून त्याने जवळच असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Palghar Road Accident)
हा संपूर्ण अपघात परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, अपघातावेळी दुचाकीचा वेग किती होता आणि काही तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा तपास सुरू केला आहे. मात्र एकाच गावातील दोन तरुण मुलांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नानीवली गावात शोककळा पसरली आहे. (Palghar Road Accident)






