मराठी भाषा आणि भाषेतील साहित्य संवर्धनासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे. साहित्य संस्कृतीच्या माध्यमातूनच मराठी भाषा सर्वदूर पोहोचावी आणि मराठी भाषेतील साहित्याचा प्रचार प्रसार वेगाने व्हावा, या दृष्टिकोनातून सातत्याने वाचकांसाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. असाच मराठी साहित्य प्रवाहातील महत्त्वाच्या वळणांची माहिती देणारा साहित्य सरिता हा नवा उपक्रम आता राबविला जाणार आहे. त्या आनुषंगाने साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव
डॉ. मीनाक्षी पाटील यांच्याशी संवाद.
१] साहित्य सरिता हा नवोन्मेषी उपक्रम नेमका काय आहे? मराठी साहित्याला महत्त्वाचे वळण देणाऱ्या मान्यवर लेखकांची, त्यांच्या साहित्यिक कार्याची समग्र ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘साहित्य सरिता’ हा नवोन्मेषी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठी भाषेतील १५ लेखकांच्या कार्याचा वेध घेतला जात आहे. यातील ५ पुस्तके लवकरच प्रकाशित केली जाणार असून यामध्ये वि. वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, दया पवार, गंगाधर गाडगीळ आणि विजय तेंडुलकर या लेखकांचा समावेश आहे.
२] मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हा साहित्य सरिता उपक्रम हाती घेण्यात आला आहे का? होय. साहित्य संस्कृती मंडळातर्फे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन करण्यात येते. यंदा यातील १० लेखकांवरील पुस्तके प्रकाशित करण्यात आली होती. यातील उर्वरित पाच पुस्तके देखील अंतिम टप्प्यात असून यामुळे मराठी वाचकांना या महत्त्वाच्या साहित्यिकांचे साहित्य समग्र पद्धतीने अनुभवता येणार आहे. अशा प्रकारची समग्र वेध घेणारी पुस्तके आपल्याकडे नसल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.
३] या उपक्रमाचे महत्त्व आपण कसे अधोरेखित कराल? १९४० ते १९८५ पर्यंतच्या काळात मराठी साहित्य विश्वात तसेच समाजविश्वात देखील अनेक उलथापालथ झाली. याचे प्रतिबिंब या लेखकांच्या साहित्यात उमटले असल्यामुळे या दस्तऐवजीकरणाचे काम देखील या निमित्ताने झाले आहे. ही पुस्तके म्हणजे साहित्यिकांच्या साहित्याची समीक्षा नाही, तर या माध्यमातून साहित्यिकांची ओळख व्हावी आणि त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास व्हावा, हा उद्देश आहे.
४) वाचकापर्यंत ही पुस्तके पोहोचविण्याची व्यवस्था काय? आणि वाचकांची आणखी कोणत्या पुस्तकांना मागणी असते? साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणारी ही दहा पुस्तके पाचही ग्रंथागारात तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध होणार आहेत. ३६ जिल्ह्यांतील ३६ वितरकांच्या माध्यमातून ही पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. वाचकांच्या मागणीनुसार ही पुस्तके तत्काळ उपलब्ध होणार आहेत. मंडळांच्या काही पुस्तकांना सतत मागणी असते. यामध्ये रायगडची जीवनगाथा, या पुस्तकाचा समावेश आहे. याची आठवी आवृत्ती मंडळाने प्रकाशित केली आहे. याशिवाय तुकारामांची गाथा, शिवाजी महाराजांवरील पुस्तके, नामदेव गाथा यांच्याही अनेक आवृत्ती प्रकाशित केल्या आहेत.
५) भविष्यात साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने आणखी कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत? खरं तर मंडळाच्या वतीने मराठी भाषा आणि संपदेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने सतत विविध उपक्रम राबविले जातात. भविष्यात दर्जेदार साहित्य असलेल्या नवोदित साहित्यिकांची पुस्तके प्रसिद्ध केली जातीलच शिवाय डिजिटल माध्यमांशी सुसंगत असे काही उपक्रम राबवून नव्या पिढीला देखील साहित्याची गोडी लावण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. शिवाय आपल्या विपुल अशा साहित्य संपदेचा ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहेच.
- सुबोध रणशेवरे






