दी लेडी बॉस - अर्चना सोंडे गाझियाबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आर्थिक अडचणी, सामाजिक पूर्वग्रह आणि आयुष्यातील अनेक अडथळे तिच्या वाट्याला आले. मात्र, या अडथळ्यांना शरण न जाता तिने त्यांच्यावर मात केली आणि केवळ एक लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या व्यवसायाला आज ३५ लाख रुपयांच्या उलाढालीपर्यंत नेऊन ठेवले आहे. ही कथा आहे २८ वर्षीय उद्योजिका प्राची भाटिया हीची आणि तिच्या ‘चोखट’ या गृहसजावटीच्या ब्रँडची.प्राचीचे वडील पत्रकार तर आई गृहिणी. घरातील आर्थिक परिस्थिती मर्यादित होती. पूर्व दिल्लीतील प्रियदर्शनी विहार येथील लवली पब्लिक स्कूलमधून तिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तिला डिझाइन क्षेत्रात करिअर करायचे होते. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी)ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, दिल्लीतील शिक्षण आणि वसतिगृहाचा खर्च परवडत नसल्याने ती तेथे जाऊ शकली नाही. त्याऐवजी तिने गुरुग्राम येथील जी. डी. गोएंका युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. त्यासाठी तिला शैक्षणिक कर्जही घ्यावे लागले. शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी प्राचीने कॉलेजमध्ये असतानाच छोटा व्यवसाय सुरू केला. फेसबुक पेजच्या माध्यमातून ती फोटो अल्बम, फोटो प्रिंट केलेले दिवे, हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे आणि हाताने बनवलेली गुलाबाची फुले विकत असे. २०१७ मध्ये तिने जी. डी. गोएंका युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ डिझाइन पदवी संपादन केली. तिला अनेक शिष्यवृत्त्याही मिळाल्या. त्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या शिष्यवृत्तीचा समावेश होता. या शिष्यवृत्तीअंतर्गत चार वर्षे दरवर्षी ३६ हजार रुपयांची मदत मिळाली. प्राचीच्या आयुष्यातील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे व्हिटिलिगो (पांढरे डाग) हा त्वचारोग. या आजारामुळे शाळा आणि कॉलेजमध्ये तिची अनेकदा टिंगल करण्यात आली. पदवी पूर्ण झाल्यानंतर प्राचीने व्यावसायिक आयुष्याची सुरुवात केली. गुरुग्राममधील ‘एस अँड आर एक्सपोर्ट्स’मध्ये ती असिस्टंट डिझायनर म्हणून काम करू लागली. त्यानंतर ‘ली अँड फंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीत मर्चंडायझर म्हणून काम केले. मात्र, तिच्या मनात उद्योजक होण्याचे स्वप्न सतत जागे होते.नवीन नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी तिला जाणवले की तिला इतरांसाठी काम करणे आवडत नाही. दोन दिवसांतच तिने राजीनामा दिला. त्यावेळी प्राची अवघ्या २४ वर्षांची होती. नोकरीचा राजीनामा देऊन गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील आपल्या घरातून व्यवसायाला सुरुवात केली. ती उत्पादनांचे डिझाइन तयार करायची. कारागिरांना भेटायची, फोटोशूट करायची आणि आपल्या वेबसाइटवर ती उत्पादने विक्रीसाठी ठेवायची. सुरुवातीला सर्व काही ती एकटीच करत होती. अननस फ्रुट बास्केट, नेत्रा टिश्यू होल्डर आणि बुलबुल कटलरी होल्डर यांसारख्या केवळ सात उत्पादनांपासून तिने सुरुवात केली. या उत्पादनांच्या निर्मितीसाठी तिने मुरादाबाद, जयपूर आणि नोएडा येथील कारागिरांशी संपर्क साधला. वयाने लहान आणि त्यात महिला असल्यामुळे अनेक अनुभवी कारागिरांकडून तिला सुरुवातीला विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या डिझाइनवर विश्वास ठेवून ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. प्राचीची डिझाइन्स प्रामुख्याने निसर्ग, पक्षी, फळे आणि प्राण्यांपासून प्रेरित असतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील नात्याचे प्रतीक तिच्या उत्पादनांतून दिसून येते.नोकरीचा अनुभव आणि डिझाइनची आवड यांच्या जोरावर तिने स्वतःचा होम डेकोर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांच्या चर्चेनंतर ब्रँडचे नाव ठेवण्यात आले, ‘चोखट’. कोणतेही बाह्य गुंतवणूकदार किंवा आर्थिक पाठबळ नसताना तिने स्वतःच्या बचतीतील एक लाख रुपयांमधून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केला त्यावेळी तिच्या कुटुंबात फक्त वडील आणि मोठी बहीण कमावणारे होते. व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामचा आधार घेतला. सुरुवातीला दिवसाला केवळ ४० रुपयांच्या जाहिराती चालवल्या जात होत्या. त्यासोबत पत्रके वाटणे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग घेणे अशा पारंपरिक पद्धतींचाही वापर करण्यात आला. कालांतराने तिचे मार्केटिंग बजेट वाढून दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचले.पहिल्या काही महिन्यांत ऑर्डर्स अत्यल्प होत्या. मात्र, प्राचीने प्रयत्न सुरूच ठेवले. त्याचे परिणामही दिसू लागले. पहिल्या वर्षी ३ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ११ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी ११.३ लाख रुपये तर चौथ्या वर्षी ३५.५ लाख रुपये उलाढाल झाली.कोरोना महामारी आणि लॉकडाऊन अनेक व्यवसायांसाठी संकट घेऊन आले. प्राचीचाही व्यवसाय त्यातून सुटला नाही. मात्र, तिने परिस्थितीला संधीमध्ये बदलले. लॉकडाऊन काळात सोशल मीडियावरील वाढलेली सक्रियता ओळखून तिने डिजिटल मार्केटिंगवर भर दिला. परिणामी, तिला तब्बल ११.५ लाख रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या.आज ‘चोखट’कडे ७० हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. देशभरातून ऑर्डर्स मिळतात. प्राची आता १२०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या कार्यालयातून काम करते. तिच्यासोबत दोन इंटर्न आणि एक पूर्णवेळ पॅकिंग कर्मचारी काम करतात. कुर्मा कँडल होल्डरपासून ते १६९९ रुपयांच्या अननस फ्रुट बास्केटपर्यंत विविध उत्पादने ग्राहकांना उपलब्ध आहेत. सध्या सर्व उत्पादने केवळ त्यांच्या वेबसाइटद्वारे विकली जातात. एप्रिल २०२३ मध्ये ‘चोखट’चे रूपांतर ‘चोखट होम प्रा. लि.’ या खासगी मर्यादित कंपनीत करण्यात आले. प्राचीचे ध्येय केवळ व्यवसाय चालवणे नाही, तर ‘चोखट’ला ४०० कोटी रुपयांची कंपनी बनवणे आणि गृहसजावटीच्या उत्पादनांसाठी ग्राहकांची पहिली पसंती ठरणे हे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलीपासून ते यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा प्राची भाटियाचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर असलेल्या विश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे.आर्थिक अडचणी, सामाजिक पूर्वग्रह, आरोग्यविषयक संघर्ष आणि व्यावसायिक आव्हाने यांवर मात करत तिने सिद्ध केले की, मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेण्याची तयारी असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो.






