Wednesday, June 17, 2026

दु:खातून फुले वैयक्तिक विकास...

दु:खातून फुले वैयक्तिक विकास...

माेरपीस-पूजा काळे माणसांना माणसात आणण्याचं काम करणारे, पीडितांच्या जीवनात चैतन्याची ज्योत तेवत ठेवणारे बाबा आमटे यांचं आयुष्य म्हणजे दीनदुबळ्यांसाठी आशेचा किरण. या जाणिवेतून जगण्याच्या लढाईत युगप्रवर्तक विचारांनी प्रेरित झालेला दुःखी माणूस स्वसामर्थ्याच्या कक्षा ओळखून नवी स्वप्न पाहू लागला. दु:खितांना आपल्या कवेत घेऊन फिरणारी आनंदवन सारखी चैतन्यमय वास्तू वैयक्तिक विकासाचा मार्ग ठरू लागली. समाजभान जपलेलं समाजमन काठी बनलं. आजाराने झिजलेल्या कृष शरीराचं मनोधैर्य उंचावण्यासाठी, त्याला उभं करण्यासाठी संघर्षाची पायाभरणी झाली. जन्मजात लढा, दुःखाला सहन करण्याची ताकद आणि वेदनेला खपली भरण्याचं काम नंदनवनाने स्वीकारलं, जोपासलं आणि पुढे जाऊन अनेकांच्या आयुष्यात स्वप्निल चांदण्याचं नंदनवन फुलवलं. दुःखितावर फुंकर घालणारी माणसं स्वतः आगीत होरपळलेली असली तरी, दैवी वरदहस्त लाभल्याने ती इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवतात, याचं उत्तम उदाहरण म्हणून नंदनवनाकडे पाहाता येईल. गंभीर प्रकारच्या दुर्धर आजाराने पछाडलेल्या, समाजाने वाळीत टाकलेल्या आणि अनाथांचे नाथ झालेल्या आनंदवनातल्या छत्रछायेत हजारोंनी आपला आत्मविश्वास कमावला, इथून आत्मसन्मानाची ज्योत पेटत राहिली. हाताला काम मिळाल्याने मनातला न्यूनगंड संपला, स्वप्नांना नवे पंख लाभले, मनाने गगन भरारी घेतली. विश्वासाचा जय होता होता विकासाचं श्रद्धेत परिवर्तन झालं आणि नव्या विचारांची मुळं रोवली गेली. शारीरिक दुःखातून उमललेला वैयक्तिक विकास हजारोंच्या संख्येने मैलोनमैल फैलावत गेला.

दुःखाचा सखोल विचार करता शारीरिक व्याधीतून जन्मलेलं दुःख ते मानसिक अनारोग्यातून आलेलं दुःख याचा ऊहापोह करणं म्हणजे मानवी जीवनाच्या अत्यंत नाजूक पण महत्वाच्या अशा अनिवार्य पैलूंचा विचार होणं. जीवनात कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो. काही लोकांचं दुःख उघडपणे दिसतं तर काहींचा संघर्ष पूर्णपणे अदृश्य असतो. कधी तो पैशांचा प्रश्न असू शकतो, तर कधी नाते संबंधातील तणाव असू शकतो किंवा स्वत:च्या मनाशी चाललेली एखादी मोठी लढाई असू शकते. यास्तव दुःखातून निर्माण होणाऱ्या मानसशास्त्राच्या पायवाटा अधोरेखित करताना त्या वाटा वैयक्तिक विकासाकडे वळल्याचे चित्र दिसतं. मानवी दुःखाचे अर्थ समजून घेताना, विकासाच्या पहिल्या टप्पात येणारा वैश्विक चिंताग्रस्त प्रश्न पडतो की, माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे? याचं उत्तर सोपं आहे, जसं की व्यक्तिगणिक दुःखाची जातकुळी वेगळी असली तरी, त्यातल्या असामान्य वेदना टाळता येत नाहीत. संघर्षातून दु:खामागील उद्देशाचा पाठपुरावा केल्यास मानवी जीवनाला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. संघर्षातून नवा दृष्टिकोन चित्कारतो ज्यातून मार्ग काढणं सोपं होतं. कोणतीही समस्या सोडविण्याची पाहिली पायरी म्हणजे ती समस्या आहे हे मान्य करणं त्यामुळे जितक्या लवकर आयुष्यात दुःखाचा प्रवेश होतो तितक्या लवकर ते सहन करण्याची व त्यावर मात करण्याची तसंच परिस्थितीतून उभं राहण्याची शक्ती येते. कधी कधी मनोभूमिकेच्या सुप्तावस्थेत आदर्श परिस्थितीची गोड कल्पना आपण केलेली असते; परंतु याहून वेगळं असं नियंत्रण नसलेलं वास्तव असतं. अपेक्षेचं रान आणि वास्तवाचं भान असलेली दोन वेगळी टोकं एकत्र कशी नांदणार? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. अपेक्षा विरुद्ध वास्तव यांतली दरी मोठी होत जाता उद्भवलेली निराशा आपण स्वीकारतो आणि त्या प्रसंगाला साजेशी मानसिकता निर्माण होते. जितक्या जास्त समस्या, अडचणी आणि दुःखे जीवनात येतात तितक्या लवकर त्यावर मात करण्याची शक्तीही त्यायोगे निर्माण होते. संकटातून सर्वश्रेष्ठ शिक्षण मिळत असल्याने आनंदातून नव्हे तर आलेल्या परिस्थितीतून आपण शिकतो आणि शहाणे होतो. दुःखाचा अर्थ शोधताना सापडलेली दुसरी अवस्था म्हणजे कठीण समय. काळावर आघात करणाऱ्या कठीण परिस्थितीत माणूस जगू लागतो तेव्हाचं त्याला जगण्याचा अर्थ उमगतो. समोरचे दुःख मानवाला प्रगल्भ बनवते, शहाणे करून सोडते आणि अंतर्मुख करते. वेदनेमागे लपलेला विकास समजायला वेळ लागतो, पण सन्मान, मर्यादा, माणुसकी, चुकीचे नातेसंबंध या गोष्टी सांभाळल्या की, मानवी वैचारिक क्षमता वाढून लवचिकता निर्माण होण्यास अवधी लागत नाही. जेवढा मोठा संघर्ष तेवढी मोठी लवचिकता निर्माण झाल्याने मनातील वेदना कमजोरी न राहता परिपक्वतेची खूण बनून राहतात. असं म्हटले जाते की, माणसाने सुखात अटकू नये आणि दुःखातही भटकू नये. सुखापेक्षा दुःखाचे चटके तीव्र, वेदनादायी असल्याने परीक्षेत तावून सुलाखून निघालेला प्रत्येक विद्यार्थी हुशार होतो. शिवाय संकटांचा सामना करायला तो हार मानत नाही. विकासाचे दरवाजे उघडायला वेळ लागू शकतो, पण जेव्हा उघडतात तेव्हा सर्वसामर्थ्य बलवान ठरतात. अंतर्मनातला आवाज ऐकता आला, तर सर्वांगीण विकासाची सुरुवात आपल्यापासून होते. आयुष्य नवं काही शोधण्याची संधी देत असल्याने, समस्यांचे ऋण मानण्यात धन्यता मानावी. खऱ्या भावना समजून घेणं हा मानसिक आरोग्याचा पाया असल्याने दुःखातून उमगलेला वैयक्तिक विकास सामर्थ्य वाढवतो. उत्तरोत्तर तुम्हाला वर आणतो. गरज आहे फक्त स्वतःला ओळखण्याची. हार न मानता काळाला सामोर जाण्याची. विचार बदला जग बदलेल या न्यायाने दुःखाला स्मरण करून द्या. चांगल्या वाईटाची नशा पिऊ द्या. मगच त्याला वाचा फुटेल. संथगतीने पडणारं पाऊल यशाकडे कूच करेल. यावेळी उन्नतीचे शिखर लांब नसेल. प्रयत्न करून पाहा. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्माचा अचूक नियम म्हणजे आपण जगाला जे देतो, तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येते. आजच्या घडीला जाणीव नेणिवांवर अवलंबून असलेला वैयक्तिक विकास आपला धर्म मानून कूच करण्यात शहाणपण आहे असं मला वाटतं.दुःखातून उमलते जीवन सारं, होई विकास वैयक्तिक... न द्यावा अतिरिक्त भार, सुसंगती घडो वैचारिक.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा