Sunday, April 5, 2026

काचेपलीकडचे जग

काचेपलीकडचे जग

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ

शारीरिक प्रकृती उत्तम असूनही माणूस कधीकधी मनाने खचतो म्हणजे शरीरापेक्षा मन ही गोष्ट महत्त्वाची होऊन जाते आणि मन जशा सूचना देतो त्याप्रमाणे शरीर हालचाल करत राहते. मनच संपूर्णतः शरीराचा ताबा घेते. हे जे काही मी लिहीत आहे ते तुम्हाला एका उदाहरणाने कदाचित पटू शकेल.

एक मोठा काचेचा माशाचा टँक आणून त्याच्याबरोबर मध्ये दुसरा काचेचा तुकडा ठेवून त्याचे दोन भाग केले. एका बाजूला मांसाहारी मासा ठेवला आणि दुसऱ्या बाजूला त्याला खाण्यासाठी आवडणारे काही छोटे मासे ठेवण्यात आले. साहजिकच या मांसाहारी माशाने आपला मोर्चा छोट्या माशांकडे वळवला पण तो त्यांच्याकडे पोहोचू शकला नाही. कारण मध्ये काच होती. तो जेव्हा जेव्हा या माशांकडे जायचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा त्या काचेला त्याची ठोकर व्हायची. जसजशी त्याची भूक वाढत गेली तसतशी अधिक वेगाने त्याने छोट्या माशांकडे जाण्याचा प्रयत्न केला; परंतु यामुळे तो अधिकच जखमी होत गेला. तो थकला आणि त्याने त्या छोट्या माशांकडे जाणे सोडून दिले. तो तळाशी जाऊन शांतपणे पडून राहिला. मासे जेव्हा थकतात तेव्हा ते तळाशी जातात. कारण तिथे विरघळलेल्या ऑक्सिजनची घनता जास्त असते. त्याचप्रमाणे हा मासा खाली जाऊन पडलेला पाहिल्यावर त्याच्या आणि छोट्या माशांच्यामध्ये असलेला काचेचा तुकडा काढण्यात आला. आता छोटे मासे त्याच्या आसपास फिरत होते तरीही त्या मांसाहारी माशाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कारण त्यांच्याकडे जाताना आपल्याला ठोकर लागते, जखमा होतात असे त्याचे मन त्याला सांगत राहिले. त्याने मनाचे ऐकले आणि शरीरात ताकद असूनही तो जागचा हल्ला नाही. जेव्हा मासे पोहायचे थांबतात, एकाच जागी बसतात तेव्हा ते तणावग्रस्त असतात. हा मासा पूर्णत: तणावग्रस्त झाला होता. तो काही दिवस तिथेच पडून राहिला आणि शेवटी मृत्युमुखी पडला.

हा प्रयोग पाहून आपल्या लक्षात आले असेल की त्या मांसाहारी माशाला एक शेवटचा प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती, जेव्हा तो भुकेला होता आणि जिवंत होता. त्याने थोडासाही प्रयत्न केला असता, तर तो सुखी झाला असता. इतकेच नाही तर जिवंत राहिला असता. गंमत म्हणजे तो मेल्यावर छोट्या माशांनी त्याला आपले खाद्य बनवले आणि ते अधिक सशक्त झाले.

माणसांच्या बाबतीत असेच घडते नाही का? आपण कधी कधी कोणत्या तरी क्षेत्रात शिक्षण घ्यायला सुरुवात करतो, काम करायला सुरुवात करतो, व्यवसाय करायचा प्रयत्न करतो, एखादी कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या लक्षात येते की हे आपल्याला जमत नाहीये किंवा हवा तसा त्याचा फायदा मिळत नाहीये. कधी अधिकचा वेळ लागतोय किंवा पैसा वाया जातोय. हवा तेवढा नफा मिळत नाही किंवा नुकसान होतंय. या सगळ्या अपयशामुळे आपण दुःखी होतो इतकेच नव्हे तर तणावग्रस्त होतो; परंतु कधीकधी यश अगदी काही पावलांवर आपले स्वागत करण्यासाठी उत्सुक असते, ती संधी आपण गमावतो. वाळवंटात जसे दूरवरून पाणी आणि हिरवळ असल्याचे भासते. प्रवासी पुढे पुढे वाटचाल करत राहतात आणि हे ओवासिस अधिक दूर दूर जात राहते; परंतु वाळवंटातही कुठेतरी निश्चितपणे पाणी मिळणार असते; परंतु प्रवासी थकून एका जागेवर बसतात आणि कदाचित त्यामुळे त्यांच्या जीवनाचा अंत होतो. म्हणूनच ‘आणखी एक प्रयत्न’ असं जरी आपण म्हणतो तरी आणखी कितीतरी प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे म्हटले जाते. हे जरी १००% खरे नसले तरी ज्या गोष्टी प्रयत्नांनी साध्य होऊ शकतात आणि कोणी त्या साध्य करून दाखवल्या आहेत त्यासाठी आपण साधना करण्याची वृत्ती सोडू नये असे मला वाटते.

शेवटी काय तर आज जी माणसे नावाजलेली आहेत मग ती क्रीडा क्षेत्रातली असोत, कलाक्षेत्रातली असोत किंवा व्यवसाय क्षेत्रातली, त्यांची आत्मचरित्र आपण जरूर वाचावीत, त्यांनी कोणते कष्ट केले याची आपल्याला त्यातून कल्पना येते. ‘वाचन’ ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. आपण ज्या क्षेत्राकडे वळणार आहोत त्या क्षेत्रातील माहितीची पुस्तके आपण वाचून घ्यावीत, त्या क्षेत्रातील दिग्गजांची चरित्र-आत्मचरित्र वाचावीत किंवा एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या अनुभवाच्या साहित्यकृती वाचाव्यात जेणेकरून आपल्याला निश्चितपणे योग्य मार्गदर्शन तर मिळतेच; परंतु आपल्या आत्मविश्वास जागृत होतो. हे मार्गदर्शन आणि हा जागृत झालेला आत्मविश्वास यामुळे काचेपलीकडचे जग आवाक्यात येते!

pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment