Monday, May 6, 2024
Homeटॉप स्टोरीNitesh Rane : खोटारड्या राऊतांचे संरक्षण काढा!

Nitesh Rane : खोटारड्या राऊतांचे संरक्षण काढा!

संजय राऊत यांना धमकी देणारा मयुर शिंदे हा राऊत यांचाच कार्यकर्ता

भाजप आमदार नितेश राणे यांची मागणी

मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी याबद्दल माहिती दिली होती. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर संजय राऊत यांना धमकी देणारा मयुर शिंदे हा सुनील राऊत यांचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आरोपी मयूर शिंदे यांचे संजय राऊत आणि सुनील राऊत दोघांसोबतही भरपूर फोटो आहेत. वाढदिवसाचा केक भरवताना देखील मयूर शिंदेचा त्यांच्यासोबत फोटो आहे, असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.

“संजय राऊतांसारख्या खोटारड्या लोकांना महाराष्ट्र सरकारने दिलेले संरक्षण काढून टाकावे. यापुढे संजय राऊतवर महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा, याबद्दल खरंच विचार करावा लागेल. जो स्वत:च्या मालकाचा झाला नाही, स्वत:च्या धर्माचा झाला नाही तो तुमचा-आमचा काय होणार याचा विचार महाराष्ट्राने करावा,” अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे, असे आ. नितेश राणे यांनी म्हटले आहे. राऊत धमकी प्रकरणात अटक केलेला मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने धमकीचा कट रचला होता, असे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे. संजय राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो. स्वत:च्याच कार्यकर्त्याकडून स्वत:लाच धमकी द्यायचा कॉल करवून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचे सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा संजय राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -