Saturday, May 11, 2024
HomeदेशWeather updates : दक्षिणेकडे पाऊस तर उत्तरेत गारठा; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather updates : दक्षिणेकडे पाऊस तर उत्तरेत गारठा; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

मुंबई : हिवाळ्याचा मोसम (Winter season) सुरु झाला आहे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिणेकडील राज्यांत (South Indian states) मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये (North Indian states) गारठा वाढला आहे. दिल्लीचं रात्रीच्या वेळचं किमान तापमान ६ अंश सेल्सिअस तर दिवसाचं किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतकं कमी झालं आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. महाराष्ट्रात (Maharashtra weather) देखील पारा घसरुन थंडी पडायला सुरुवात झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ आता कोमोरिन क्षेत्र आणि शेजारच्या परिसरात पोहोचलं आहे, त्यामुळे पावसाचा कहर सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

उत्तर भारतात शीत लहरींमुळे काही राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशासह देशातील अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी घट होईल, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. या राज्यांमध्ये जोरदार थंड वारे आणि धुक्याची चादर दिसेल. पुढील आठवड्यात या भागात दिवसभर हाडं गोठवणारी थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मैदानी प्रदेशातील राज्यांमध्येही आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

याउलट डिसेंबर महिना संपत आला आहे आणि महाराष्ट्रात आता कुठे थंडीला सुरुवात झाल्याची चिन्हे आहेत. आज महाराष्ट्रात कोरडं वातावरण पाहायला मिळणार असून पारा घसरणार आहे. राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच दिवसाच्या सरासरीपेक्षा तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान यवतमाळ येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यवतमाळसह धुळे येथेही पारा ७.५ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीच्या लाटेची परिस्थिती आहे. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वर आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२, धुळे ७.५, जळगाव ११.७, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १२.९, नाशिक १४.४, निफाड ११.२, सांगली १५.८, सातारा १५.१, सोलापूर १५.५, सांताक्रूझ २१.२, डहाणू १९.५, रत्नागिरी २४.४.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -