Monday, May 6, 2024
Homeमहामुंबईराजकीय तणावाचा पोलिसांवर ताण

राजकीय तणावाचा पोलिसांवर ताण

आता ड्युटीही १२ तासांवर आणि सुट्ट्याही होणार रद्द!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात निर्माण झालेली राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई राजकीय तणावाचा पोलिसांवर ताण आला असून रजेवर गेलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोंडींनी ढवळून निघत असून राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरू झालं. राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आसाममधील गुवाहाटीत गेलेल्या काही आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राज्यात निर्माण झालेली राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे.

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्याच्या विविध भागात शिंदे विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस अंमलदार व हवालदारांची ड्यूटी आठ तासांवरून १२ तासांवर करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर राहणार असून रविवारी साप्ताहिक सुटी घेणार नाही. त्यांना आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्टी दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक करून तोडफोडही केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -