Monday, May 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

शरद पवारांच्या खेळीकडे अवघ्या देशाचे लक्ष!

मुंबई : महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर, काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९ विरोधी पक्षांना डावलून अदानी चौकशी प्रकरणात घेतलेली विरोधी भूमिका आणि उद्धव ठाकरे यांचे कान टोचल्यानंतर त्यांनी थेट सिल्व्हर ओक गाठले. त्यातच १५ आमदार बाद झाल्यावर अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या अंजली दमानिया यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये अनेक घडामोडी घडत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींची दखल केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडूनही घेतली जात आहे.

पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा बावणकुळे आणि शेलारांना फोन!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला. या दोन्ही भाजप नेत्यांनी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. तर या दोन्ही भाजप नेत्यांनी दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते बैठका देखील घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात अमित शाह लक्ष घालत असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

१५ आमदार बाद झाल्यावर अजित पवार भाजपसोबत जाणार!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरुन त्यांनी एक ट्विट केले आहे. राज्यामध्ये लवकरच १५ आमदार बाद होणार आहेत व त्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. काल ज्यावेळी मी मंत्रालयात गेले होते तेव्हा एकाने मला हे सांगितले, असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार नॉटरिचेबल!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे नॉटरिचेबल झाल्याची बातमी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही आमदार देखील आहेत, असे बोलले जात होते. यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी कुठेही नॉटरिचेबल नव्हतो. माझी तब्येत बरी नसल्याने मी आराम करत होतो, असे ते म्हणाले होते.

उद्धव ठाकरे-संजय राऊतांबरोबर पवारांची सव्वा तास चर्चा

कान टोचल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या सव्वा तास चाललेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर स्वतः शरद पवारांनी मत मांडले आहे. ते बुधवारी (१२ एप्रिल) पुण्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “काही मुद्द्यांवर वेगळी मतं असली, तरी आज महाविकासआघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एक विचाराने काम करावं अशाप्रकारची आमची चर्चा झाली. त्याप्रमाणे काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हे धोरण आमचं ठरलं आहे.”

स्वातंत्र्यवीर सावरकर, अदानी किंवा मोदींची पदवी यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असल्याच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून आगामी निवडणुकांना संयुक्तपणे सामोरे जाण्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत भर देण्यात आला. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची युती झाली असली तरी वंचितला महाविकास आघाडीत प्रवेश देण्याबाबत मात्र सहमती होऊ शकली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -